अचानक संपूर्ण शरीराला कंप सुटणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अनामिक भीती वाटणे, अस्वस्थ वाटणे, धाप लागणे, जणू वाटावे की हार्ट अॅटॅक आला आहे, आता काही उरले नाही. सर्व काही संपले आहे. असे तुम्हाला कधी वाटले आहे? हा पॅनिक अॅटॅक आहे. तरुण आणि महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.
काही बाबतीत पॅनिक अॅटॅकचे कारण चिंता, निराशा, उदासीनता हेही असू शकते. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या संशोधनातून दिसून आले आहे की, पॅनिक अॅटॅक एकप्रकारे चिंता विकार आहे. अनेकवेळा एखाद्या प्रकारची भीती किंवा फोबियाही पॅनिक अॅटॅकचे कारण बनू शकतो.
अचानक एखाद्या गोष्टीची भीती मन व्यापून टाकू लागते
तणाव येणे आणि हृदयाचे ठोके वेगाने पडणे
पायांमध्ये कंप येणे
डोकेदुखी आणि अस्वस्थता
उलटी आणि पोट बिघडणे
लहान लहान गोष्टींचा ताण येणे
थंडीतही गरम होणे, घाम येणे
संपूर्ण शरीरात थरथर होणे
संतुलन बिघडणे किंवा बेशुद्ध होणे
पॅनिक अॅटॅक येण्याची कोणतेही खास कारण नाही. पण तुम्ही तणावग्रस्त असाल, एखादी चिंता असेल तर त्याच्याशी पॅनिक अॅटॅक निगडित असू शकतो. त्याचबरोबर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि दम्याच्या रुग्णांना पॅनिक अॅटॅक आला तर तो गंभीर इशारा असू शकतो. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याबाबत उद्भवू शकते, याची मानसिक तयारी रुग्णांनी करायला हवी.
पॅनिक अॅटॅकची लक्षणे बरीचशी हार्ट अॅटॅकच्या लक्षणांसारखी असतात. हृदयात जोरजोरात धडधड होते, घाम येऊ लागतो, श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. अनेक वेळा हृदयविकाराचे, मधुमेहाच्या रुग्णांमध्येही साखरेचा स्तर कमी झाल्यावर किंवा एखाद्या औषधाची रिअॅक्शन, हार्मोन डिसऑर्डर, दमा, धूळ, माती किंवा अन्य कशाची अॅलर्जी असेल तर त्यामुळेही पॅनिक अॅटॅक येऊ शकतो.
पण पॅनिक अॅटॅक आल्यावर डॉक्टरांकडे लगेच जायला हवे. कारण पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अॅटॅक दोन्हींची लक्षणे सारखीच असतात. दोन्हींची तपासणीही ईसीजीमार्फतच होते, त्यामुळे अशा प्रकारची तपासणी कोणत्याही परिस्थितीत आवश्यकच आहे. पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अॅटॅकमध्ये फरक असतो.
पॅनिक अॅटॅकमध्ये माणसाची अवस्था हार्ट अॅटॅक आलेल्या व्यक्तीप्रमाणेच होते. पण पॅनिक अॅटॅकमध्ये वेदना होत नाही. छातीत दुखत नाही की शरीराच्या अन्य भागातही वेदना होत नाही. दोन्ही अॅटॅकमध्ये एड्रेनेलिन हार्मोनचा स्त्राव होतो, त्यामुळे या दोन्हींत फरक करणे काही वेळा कठीण जाते.
तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक त्रास असेल किंवा एखाद्या कामाविषयी चिंता असेल तेव्हा तुम्हाला पॅनिक अॅटॅक येण्याची शक्यता असते. तपासणी आणि इलाजानंतर ही अचानक निर्माण झालेली समस्या आहे, हे समजून येते. मात्र, पॅनिक अॅटॅक आल्यावरही डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण, त्यातूनच हा पॅनिक अॅटॅक आहे की हृदयाशी संबंधित काही विकार आहे हे समजून येईल. एन्जाईना या रक्तवाहिन्यांशी निगडित आजारातही पॅनिक अॅटॅकप्रमाणेच लक्षणे दिसतात. त्यामुळे असा अॅटॅक आल्यानंतर रक्तवाहिन्यांत कुठे अडथळा निर्माण झालेला नाही ना, हे तपासून घेण्याची गरज असते. दोन्हींतही घाम येतो, जीव घाबरा होतो.
फेफरे येणे आणि पॅनिक अॅटॅक यातही फरक आहे. दोन्हीतही माणूस बेशुद्ध होतो. फेफर्याला डॉक्टर पॅनिक अॅटॅक मानत नाहीत. कारण फेफरे हा मेंदूचा विकार आहे. यात व्यक्तीला जेव्हा अॅटॅक येतो, तेव्हा ती हातपाय झाडू लागते, कधीकधी रुग्णाच्या तोंडातून फेसही येतो. जेव्हा व्यक्तीवर जबरदस्त तणाव येतो, तेव्हा येणार्या पॅनिक अॅटॅकमध्येही ही लक्षणे दिसू शकतात, पण ते फेफरे नसते.
पॅनिक अॅटॅक येण्याची कारणे निश्चित नाहीत. कोणत्याही परिस्थितीत हा अॅटॅक येऊ शकतो. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, आरामदायी जीवनशैली जगत असताना किंवा अगदी झोपेत असतानाही हा पॅनिक अॅटॅक येऊ शकतो. पॅनिक अॅटॅकचा संबंध जीवनातील मोठ्या बदलांशी जोडला गेला आहे.
आयुष्यात घडलेली एखादी वाईट घटना पॅनिक अॅटॅकचे कारण होऊ शकते. मानसिक तणावाखाली असणार्या व्यक्तींना हा अॅटॅक येण्याची शक्यता असते. काही लोकांना गर्दी, लिफ्टच्या वातावरणात पॅनिक अॅटॅक येतो आणि ते अशा ठिकाणी जाण्यास कचरतात. पॅनिक अॅटॅक कोणत्याही कारणाने आला तरी तो आल्यावर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे.