सत्येंद्र जैन तुरुंगात नाही रिसॉर्टमध्ये – तुरुंगात जैन यांना व्हीव्हीआयपी सुविधा, भाजपचा आरोप | पुढारी

सत्येंद्र जैन तुरुंगात नाही रिसॉर्टमध्ये - तुरुंगात जैन यांना व्हीव्हीआयपी सुविधा, भाजपचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्ली आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपने बुधवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये जैन त्यांच्या बॅरेकमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलपद्धतीचे जेवण करताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर जैन यांना तुरुंगात व्हीव्हीआयपी सुविधा पुरवली जात असल्याचा आरोप भाजपकडून पुन्हा एकदा करण्यात आला आहे.

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचे तिहार तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यात जैन त्यांच्या बॅरेकमध्ये मसाज करवून घेताना दिसले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजनंतर जैन यांना तुरुंगात व्हीआयपी सुविधा पुरवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्हिडीओनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हे फुटेज न्यायालयात सादर करत तक्रार केली होती. या प्रकरणानंतर भाजपने आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले होते. आम आदमी पार्टी स्पा आणि मसाज पार्टी बनली आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्यानंतर जैन यांचा आणखी एक व्हिडीओ भाजपने व्हायरल केला आहे.

या व्हिडीओमध्ये जैन फाईव्ह स्टार हॉटेल पद्धतीचे जेवण करताना दिसत आहेत. यासोबतच ते फळे देखील खात आहेत. या व्हिडिओनंतर जैन यांना तुरूंगात व्हीव्हीआयपी सुविधा मिळत आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला आहे. दिल्ली भाजपचे नेते हरीश खुराना व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जैन यांना मिळत असलेल्या सुविधा पाहून ते एखाद्या रिसॉर्ट मध्ये असल्याचे वाटत आहे. दरम्यान तिहार तुरुंगात जैन यांचे २८ किलो वजन कमी झाल्याचा दावा त्यांच्या वकिलाने केला होता. पण तुरुंगात जैन यांचे वजन 8 किलोने वाढले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button