सावरकरांनी लिहून दिला होता माफीनामा, फडणवीस, भागवतांना पत्र दाखवा त्यांनाही कळेल : राहुल गांधी

सावरकरांनी लिहून दिला होता माफीनामा, फडणवीस, भागवतांना पत्र दाखवा त्यांनाही कळेल : राहुल गांधी
Published on
Updated on

अकोला; पुढारी वृत्तसेवा : 'सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ' असे पत्र व्ही.डी.सावरकर यांनी इंग्रजांना लिहिले होते. असे सांगत सावरकरांनी लिहीलेले माफीचे पत्र राहूल गांधी यांनी आज माध्यमांसमोर दाखवले. हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघलाचक मोहन भागवत यांनाही दाखवा. सावरकरांनी महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांनाही पत्रावर स्वाक्षरी करायला सांगितल्याचा उल्लेख आहे. त्यांनी देशाचा व तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा विश्वासघात केला, असा आरोप राहूल गांधीं यांनी केला.

'भारत जोडो यात्रेचा आज (गुरुवारी) ७१ वा दिवस असून यात्रा जिल्हयातील पातूर येथून सकाळी निघून वाडेगावात पोहचली. वाडेगावातील बुलडाणा अर्बनच्या वेअर हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राहूल गांधींनी अनेक मुद्यांवर माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून केवळ तपास यंत्रणाच नव्हे तर न्याय व्यवस्थेवरही दबाब आणला जात आहे. या घटनात्मक समस्यांशिवाय देशात सर्वसामान्यही गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. तरुणांना सध्या नोकरी मिळण्याची शाश्वती राहिली नाही. शिक्षणासाठी मोठा पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे गोरगरीब चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरोग्याच्या सुविधेसाठी खर्च करावा लागत असल्याने सामान्य नागरीक हवालदील झाले आहेत. देशात सरकारी शाळा, सरकारी दवाखान्यांऐवजी खासगीकरणाला चालना दिली जात आहे. सर्व पैसे उद्योगपतींकडे कसे जातील, याकडेच सरकारचे अधिक लक्ष आहे. या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच भारत जोडो यात्रा काढली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही ते म्‍हणाले.

सरकारला वाटत असेल तर यात्रा रोखावी

राज्यात काही लोक यात्रा रोखायची भाषा बोलत आहेत. मात्र शासनाला जर योग्य वाटले तर त्यांनी यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करावा. मी माझे विचार स्पष्ट मांडले. त्यांची विचारधारा विरोधात असेल तर त्यांनी यात्रा रोखावी आमची काहीही हरकत नाही, असेही राहूल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रेला सर्वसामान्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. विचारांची लढाई विचारांनी लढावी. ही यात्रा आता श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावूनच थांबेल, असेही राहुल गांधी यांनी स्‍पष्‍ट केले.

पैसे देवून विरोधक संपवण्याचा प्रयत्न

भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार यात्रेत सहभागी झाले आहेत. एका ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की, एका आमदाराला ५० कोटीची ऑफर दिली. पैशांच्या, तपास यंत्रणांच्या भरवशावर काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात अजूनही चांगले लोक आहेत. जे विकाऊ होते ते विकले गेले, इतर चांगली लोक आमच्यासोबत निश्चित येतील, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.

 पंतप्रधांनांना प्रश्न विचारा

महागाई, बेरोजगारी सारखे अनेक प्रश्न देशात आहेत. सरकारला त्याच्याशी काहीही घेणे देणे दिसत नाही. अनेक ठिकाणी नागरिकांनी आमच्याजवळ नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी वेळेत पीक विमा भरतात. मात्र, त्यांना पैसे मिळत नाहीत. त्यांचे कर्ज माफ होत नाही. ऐन संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नाही. मात्र, भाजपचे नेते शेतक-यांवर काहीच बोलत नाहीत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धार्मिक मुद्दे पुढे आणतो. जनतेच्या प्रश्नावर आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, असेही राहुल गांधी यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news