पुढारी ऑनलाईन : आदिवासी गौरव दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेली बस पलटी होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले आहेत. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी उमरीपान आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
शहडोल (मध्य प्रदेश) येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती म्हणजेच आदिवासी गौरव दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाली होती. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही सहभागी होत आहेत. ही बस सिहोरा येथील कुंदवळ येथून सुमारे ५० प्रवाशांना घेऊन शहडोलकडे जात होती. सिहोराहून निघालेल्या प्रवासी बसचे उमरियापन येथील एका गावाशेजारी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचत, जखमींना बसमधून बाहेर काढले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अंशू कोळ (रा. कुडवळ) असे मृताचे नाव आहे. जिल्हाधिकारी अवी प्रसाद आणि एसपी सुनील जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृताच्या घरी पोहोचून त्यांचे सांत्वन केले. काही जखमींना उपचारासाठी जबलपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आले असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.