सामाजिक सलोख्‍याचा आदर्श...मदरशातील विद्यार्थी गिरवतायत संस्‍कृतचे धडे! | पुढारी

सामाजिक सलोख्‍याचा आदर्श...मदरशातील विद्यार्थी गिरवतायत संस्‍कृतचे धडे!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एका मदरशातील विद्यार्थी हिंदू गुरुच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍कृत शिकत आहेत, हे वाचलं तरी तुम्‍हाला आश्‍चर्याचा धक्‍का बसला असेल; पण हे वास्‍तव आहे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील एका मदरशाचे. इस्लाम धर्माचे शिक्ष‍‍ण दे‍णाऱ्या या मदरशाने सामाजिक सलोख्‍याचा आदर्श सर्वधर्मीयांसमोर ठेवला आहे. संपूर्ण देशात आदर्श ठरलेला या उपक्रमाविषयी जाणून घेवूया…

काय आहे यामागील उद्देश?

त्रिशूर जिल्ह्यातील इस्‍लामिक ॲकडमी ऑफ शरिया अँड ॲडव्‍हान्‍सड स्‍टडीज मदरशातील विद्‍यार्थी आणि प्राध्‍यापक हे
संस्‍कृतमध्‍ये बोलतात. या बाबत प्राचार्य ओनमपिल्ली मुहम्मद फैझी यांनी सांगितले की, संस्कृत, उपनिषद, पुराणे इत्यादी शिकवण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये इतर धर्मांबद्दल ज्ञान आणि जागरूकता निर्माण करणे हा आहे. मी स्वत: अशा तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. म्हणून, मला असे वाटले की विद्यार्थ्यांना इतर धर्म आणि त्यांच्या चालीरीतीविषयी माहिती असावी. संस्कृतचा सखोल अभ्यास आठ वर्षांच्या अभ्यास कालावधीत शक्य होणार नाही. मात्र दुसर्‍या धर्माबद्दल जागरूकता निर्माण करणे ही या शिकवणी मागील कल्पना आहे,” असेही फैझी यांनी स्‍पष्‍ट केले.

विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आठ वर्षांच्या कालावधीत भगवद्गीता, उपनिषद, महाभारत, रामायण यातील महत्त्वाचे भाग संस्कृतमध्ये शिकवले जातात. ही संस्था प्रामुख्याने एक शरिया महाविद्यालय असल्‍याने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उर्दू आणि इंग्रजी सारख्या इतर भाषा देखील शिकवल्या जातात, असेही ते म्‍हणाले.

चांगले शिक्षक शोधण्याचे मोठे आव्हान

विद्यार्थ्यांना संस्कृत, भगवद्गीता, उपनिषद इत्यादी योग्य पद्धतीने शिकवण्यासाठी चांगले शिक्षक शोधण्याचे मोठे आव्हान आमच्‍या संस्‍थेसमोर होते. मागील सात वर्षांपासून आम्‍ही हा उपक्रम राबवला आहे.आमच्याकडे येथे उत्कृष्ट शिक्षक आहेत. ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी चांगला अभ्यासक्रम तयार केला आहे. तसेच संस्‍कृत शिकण्‍यासाठी विद्यार्थ्यांचाही प्रतिसादही उत्तम आहे. त्यांनी संस्कृत शिकण्यात रस दाखवला आहे, असेही प्राचार्य फैझी यांनी नमूद केले.

उपक्रमाचे सर्वधर्मियांकडून स्‍वागत

प्राध्यापक के के यथींद्रन यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, मदरशामध्‍ये संस्‍कृत शिकवण्यासाठी मला आमंत्रित केले गेले. यावेळी इथे हिंदू किंवा मुस्लिम असा कोणताही मुद्दा नाही. मी तिथे शिकवायला तयार असल्‍याचे कळविले. मी मदरशामध्‍ये संस्‍कृत शिकवतोय याचे सर्वधर्मियांकडून स्‍वागत होत आहे.

सुरुवातीला संस्कृत शिकणे कठीण होते…

सुरुवातीला अरबीप्रमाणेच संस्कृत शिकणे कठीण होते; परंतु सतत अभ्यास आणि सराव केल्याने ते कालांतराने सोपे होते.
आपण त्याचा सतत अभ्यास केला, सराव केला, तर अरबी भाषेप्रमाणेच ते काही काळाने सोपे होते. नियमित वर्ग आणि चाचण्या देखील आम्हाला संस्‍कृत शिकण्यास मदत करतात, असे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्‍थेशी बोलताना एका विद्यार्थ्याने सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button