Indian Rupee | अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत! आठवडाभरातील २ टक्क्यांच्या वाढीनंतर तेजी कायम | पुढारी

Indian Rupee | अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत! आठवडाभरातील २ टक्क्यांच्या वाढीनंतर तेजी कायम

पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉलरच्या तुलनेत रुपयात सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्यात भारतीय रुपयाने चार वर्षांतील सर्वोत्तम २ टक्क्यांची वाढ नोंदवली. तर सोमवारी भारतीय रुपया (Indian Rupee) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २५ पैशांनी म्हणजेच ०.३४ टक्क्याने वाढून ८०.५२ वर खुला झाला. दरम्यान, अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न आणि डॉलर निर्देशांक या दोन्हींमध्ये सुधारणा दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातील दोन सत्रांमध्ये डॉलर ३.६ टक्क्यांने घसरला आहे. मार्च २००९ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. अजूनही डॉलर निर्देशांक १०७ च्या खाली आहे.

देशांतर्गत बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. त्यात डॉलर कमजोर झाल्यामुळे रुपयात आणखी सुधारणा होणार असल्याचे संकेत अर्थतज्ज्ञांनी दिले आहेत. शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.७९ वर बंद झाला होता. चीनमधील कोविड प्रतिबंधात्मक बंधने शिथिल झाल्याच्या वृत्तांवरुन बहुतांश आशियाई शेअर बाजारांनी सोमवारी सुरुवातीला उच्च पातळीवर व्यवहार केला.

अपेक्षेपेक्षा कमी अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीनंतर डॉलर कमजोर झाला असून रुपया वधारलाय. अमेरिकी डॉलर इंडेक्स १०६.४१ वर आला आहे. डॉलर इंडेक्सची ही १२ आठवड्यांच्या निचांकी पातळी आहे. युरो, येन, पाउंड आणि कॅनेडियन डॉलरच्या तुलनेत अमेरिकन डॉलर कमकुवत झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या घसरणीमुळे रुपयाला अलिकडील निचांकी पातळीपासून २ टक्के वाढण्यास मदत झाली आहे. १० नोव्हेंबर रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ८१.९२ वर पोहोचला होता. (Indian Rupee)

दरम्यान, सोमवारी शेअर बाजाराची स्थिर सुरुवात झाली होती. त्यानंतर सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी घसरून व्यवहार करत आहे. निफ्टीही खाली आला आहे.

हे ही वाचा :

Back to top button