

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल मंत्रीमंडळातील मंत्री आणि तृणमूलचे नेते अखिल गिरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यांच्याविरोधात भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी आज नवी दिल्लीतील नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गिरी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी चॅटर्जी यांनी केली आहे.
ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी नंदीग्राममधील सभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. सुवेंदू अधिकारी यांच्यावर टीका करताना गिरी यांची जीभ घसरली होती. ते म्हणाले, आम्ही कोणाच्याही दिसण्यावरून न्याय करत नाही. आपण राष्ट्रपतींच्या खुर्चीचा आदर करतो, पण आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात? अखिल गिरी यांचे हे भाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी आज नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गिरी यांच्याविरुद्ध आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रपतींचा अवमान केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी उत्तर द्यावे. अखिल गिरी हे त्यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांना तातडीने बडतर्फ करावे. याशिवाय त्यांनी दिल्लीत येऊन माफी मागावी. एससी-एसटी समाजाविरुद्ध जाहीरपणे भाष्य करणे हा टीएमसीच्या मंत्र्यांचा खरा आत्मा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :