T20 WC Final ENG vs PAK : फायनलमध्ये ‘अशी’ असेल पाक-इंग्लंडची प्लेईंग 11 | पुढारी

T20 WC Final ENG vs PAK : फायनलमध्ये ‘अशी’ असेल पाक-इंग्लंडची प्लेईंग 11

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 WC Final ENG vs PAK : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी 20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज (दि.13) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. विजेतेपदासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. अंतिम फेरीत विजय मिळवून दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष असेल. 2009 मध्ये पाकिस्तान पहिल्यांदा चॅम्पियन झाला होता, तर 2010 मध्ये इंग्लंडने विजेतेपद पटकावले होते. या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर आहे. इंग्लंड संघात एक बदल निश्चित असल्याचे मानले जात आहे. मार्क वुडचा संघात समावेश होऊ शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सुपर-12 फेरीतील सामन्यात वुडला दुखापत झाली होती, त्यामुळे तो उपांत्य फेरीत भारताविरुद्ध खेळू शकला नाही. पण अंतिम सामन्यापूर्वी तो पूर्ण ताकदीने गोलंदाजी करताना दिसेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघात कोणताही बदल होण्याची चिन्हे नाहीत.

सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर बाबर आझमच्या संघाने 2022 च्या टी 20 विश्वचषकात जोरदार पुनरागमन केले. भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानने नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, या काळात या संघालाही नशीबानेही साथ दिली. नेदरलँड्सने सुपर-12 सामन्यांच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जबरदस्त उलटफेर केला. यामुळे पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले. बाबर आझमचा संघ उपांत्य फेरीतही चमकदार कामगिरी करताना दिसला. न्यूझीलंडला 152 धावांवर रोखल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार अर्धशतकी खेळी साकारून तो सामना 7 गडी राखून जिंकला. मोहम्मद वसीम (ज्यु) आणि मोहम्मद हारीस यांच्या एन्ट्रीने पाकिस्तानचा संघ चांगलाच मजबूत दिसत आहे.

मेलबर्नमध्ये ‘फायनल’वर पावसाचे सावट?, जाणून घ्या…

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता) हवामान साफ दिसत होते. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पूर्ण रंगण्याची शक्यता आहे, परंतु संध्याकाळी पावसाची थोडीफार शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मेलबर्नचे हवामान काही तासांतच बदलते. त्यामुळेच सायंकाळी पावसाची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या सामन्यासाठी 90 मिनिटे अतिरिक्त दिली आहेत. दीड तासानंतरही सामना सुरू झाला तरी सामना 20-20 षटकांचा असेल, तर मधल्या षटकांमध्ये पाऊस पडला तरी सामना पूर्ण खेळवला जाणार आहे. (T20 WC Final ENG vs PAK)

स्थानिक वेळेनुसार, सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल आणि त्याच वेळी पावसाची 52 टक्के शक्यता असल्याचे AccuWeather च्या अहवालात म्हटले आहे. पुढील दीड तास हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मात्र रात्री 9 वाजता (स्थानिक वेळेनुसार) पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता 59 टक्क्यांपर्यंत आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे जर आदल्या दिवशी जितका सामना खेळला गेला आहे, तिथून पुढे दुस-या दिवशी सोमवारी सामना खेळवला जाणार आहे. (T20 WC Final ENG vs PAK)

 

Back to top button