राज्‍यातील मध्यावधी निवडणुकीसाठी दिल्लीत तयारी सुरू : संजय राऊत | पुढारी

राज्‍यातील मध्यावधी निवडणुकीसाठी दिल्लीत तयारी सुरू : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर झाल्याने मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनीआज केला. मुंबई येथे ते माध्‍यमांशी बोलत होते.  या वेळी अमोल किर्तीकर यांनीही शिवसेनेसोबतच असल्याचे सांगितले.

खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातून एकापाठोपाठ  प्रकल्प अन्‍य राज्‍यांमध्‍ये जात आहेत. यावर कोणीच काही बोलत नाही. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत, याच्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकारण करण्यासाठी, राजकीय शत्रूत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे; पण महाराष्ट्र खचला, कमजोर झाला तर आपण राजकारण करायला उरणार नाही. याचे भान सत्ताधारी व विरोधकांनी ठेवले पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

तुरूंगातून सुटल्यानंतर आनंद झाला नाही, तेवढा आनंद अमोल किर्तीकर भेटायला आल्यानंतर झाला. गजानन किर्तीकरांनी घेतलेला निर्णय दुर्देवी आहे; पण अमोल आमच्‍यासोबत आहेत याचा आनंद आहे, असेही राऊत म्‍हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांची बैठक घ्यावी

महाराष्ट्राचे औद्योगिक नुकसान केले जात आहे. राज्याला आर्थीकदृष्ट्या कमजोर केले जात आहे. महाराष्ट्राला नकाशावरून नष्ट करण्याचे प्रयत्न पडद्यामागून सुरू आहेत. ते रोखण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे बंद केले पाहिजेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक घेणे गरजेचे आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच : अमोल किर्तीकर

गजानन र्किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज अमोल किर्तीकर यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर माध्यमाशी बोलताना ते म्हणाले की, गजानन किर्तीकर यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे. पण मी शिवसेनेसोबतच आहे. शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भविष्यातही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button