पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी (Himachal Pradesh Election 2022) आज (दि. १२) मतदान झाले. हिमाचल प्रदेशातील ताशीगांग येथील जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील 52 पैकी 51 मतदारांनी मतदान केले. येथे 98.08 % मतदान झाले.
(Himachal Pradesh Election 2022) : स्पिती खोऱ्यातील ताशीगांग हे 15256 फूट (4650 मीटर) उंचीवर असलेले एक अतिशय लहान गाव आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंचीवरील मतदान केंद्र येथे आहे. या गावात एकूण 6 कुटुंबे राहतात. येथे 52 मतदार आहेत. त्यापैकी 51 मतदारांनी मतदान केले आहे.
येथे जोरदार बर्फवृष्टी होते. त्यामुळे रस्ते बंद झाल्यामुळे गावाचा जगापासून संपर्क तुटतो. किब्बरपासून ताशीगांग 14 किमी अंतरावर आहे. या गावाला जाण्यासाठी पूर्णपणे घाट रस्ता आहे. डोंगराभोवती वळण घेत जाणारा रस्ता कच्चा आहे. येथील परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. स्पिती खोऱ्याच्या इतर भागांच्या तुलनेत हा मार्ग खूपच हिरवागार आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी आज १२ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदानास सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला असून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. राज्यातील ५५,९२,८२८ मतदान आज ईव्हीएममध्ये कैद होणार असल्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४१२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामध्ये २४ महिलांचा समावेश आहे. मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.
हिमाचल प्रदेशातील एकूण मतदारांपैकी ६७ हजार ५५९ सेवा मतदार, २२ परदेशी भारतीय मतदार आणि ५५ लाख २५ हजार २४७ सामान्य मतदार आहेत. राज्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. यामध्ये २८५४९४५ महिला, २७३७८४५ पुरुष आणि ३८ तृतीय लिंग मतदार आहेत. मतदानासाठी परदेशी मतदारांना मूळ पासपोर्ट दाखवावा लागणार आहे. ज्यांचा पासपोर्टच्या तपशीलानुसार लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत मतदार यादीत समावेश आहे.
हेही वाचलंत का ?