१५३ किलो वजनाच्या गलेलठ्ठ आरोपीला जामीन – सहव्याधींमुळे कोर्टाचा निर्णय | पुढारी

१५३ किलो वजनाच्या गलेलठ्ठ आरोपीला जामीन - सहव्याधींमुळे कोर्टाचा निर्णय

१५३ किलो वजनाच्या गलेलठ्ठ आरोपीला जामीन - सहव्याधींमुळे कोर्टाचा निर्णय

चंदीगढ, पुढारी ऑनलाईन डेस्क – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने १५३ किलो वजन असलेल्या एक आरोपीला जामीन दिला आहे. वजनामुळे या आरोपीला सहव्याधी आहेत आणि तुरुंगात योग्य उपचार मिळणे शक्य नसल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या आरोपीवर Enforcement Directorateने मनीलाऊंड्रींगचे गुन्हे दाखल केले आहेत. (Bail to man weighing 153 kg)

न्यायालयाने म्हटले आहे, “अशा प्रकारच्या सहव्याधींमुळे शरीराची आजाराशी लढण्याची क्षमता कमी होते. बहुव्याधी असलेल्या व्यक्तीला लागणारी आरोग्यसेवा तुरुंगात किंवा जिल्हा रुग्णालयांत असतेच असे नाही. त्यामुळे Prevention of Money Laundering Act (PMLA)मधील कलम ४५ नुसार जामीन मिळण्यासाठी ही व्यक्ती पात्र आहे.”

यया प्रकरणातील आरोपीवर ३ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. जवळपास ३३ लाख लोकांची फसवणूक करून ५३ कोटी स्वतः मिळवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपीच्या मते त्याने फक्त सॉफ्टवेअर विकसित केले होते, आणि त्या बदल्यात हे पैसे मिळाले आहेत.

प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळावा अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी याचिकेत केली होती. “माझ्या अशिलाची प्रकृती बिघडली आहे. यापुढे त्याला तुरुंगात ठेवणे जोखमीचे ठरेल. सत्र न्यायालयात सुनावणी इतक्यात संपणार नाही, हे लक्षात घेऊन अशिलाला जामीन मिळावा,” अशी मागणी वकिलाने केली.

तर सरकार पक्षाने जामीनाला विरोध केला. “प्रकृती बिघडली तर उपचारासाठी सरकार सक्षम आहे. या घोटाळ्याचा मुख्यसूत्रधार हा आरोपी असल्याने त्याला जामीन देऊ नये,” अशी बाजू सरकार पक्षाच्या वतीने मांडण्यात आली. या प्रकरणात सदरचा आरोपी ८ महिन्यांपासून तुरुंगात आहे, इतर सहआरोपींना जामीन मिळाला आहे, हे मुद्देही न्यायालयाने लक्षात घेतले.

हेही वाचा

Back to top button