कैलास मानसरोवर आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्यासाठी देशवासीयांनी दररोज सकाळी प्रार्थना करावी : इंद्रेश कुमार | पुढारी

कैलास मानसरोवर आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्यासाठी देशवासीयांनी दररोज सकाळी प्रार्थना करावी : इंद्रेश कुमार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कैलास मानसरोवर आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येण्यासाठी देशवासीयांनी दररोज सकाळी प्रार्थना करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे. “चीन आणि पाकिस्तानच्या कब्जातून कैलास मानसरोवर आणि पाकव्याप्त काश्मीर परत येण्यासाठी प्रत्येकाने दररोज सकाळी विशेष प्रार्थना करावी,” असे त्यांनी म्हटले आहे. कुमार यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दाही उपस्थित केला. मोदी सरकारने सीएए सारख्या उचललेल्या पावलांचे त्यांनी कौतुक केले.

इंद्रेश कुमार म्ह‍‍णाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA), २०१९ सारखी पावले उचलली आहेत. सीएए हा अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी होता, परंतू दुर्दैवाने, राजकारणाचा बळी झाल्यानंतर काही अल्पसंख्याकांनी त्यास विरोध केला. याला विरोध करणाऱ्यांनी ते अल्पसंख्याकविरोधी असल्याचे सिद्ध केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंजाबमधील अमृतसरमध्ये शुक्रवारी शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. या घटनेला ‘निंदनीय आणि दुर्दैवी’ असल्याचे ते म्हणाले. हा ‘पंजाबियत (शीख धर्म)’ वर हल्ला आहे. भारत एक आहे, त्याचे तुकडे करू नका. भारत सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा :

 

Back to top button