‘मॅडम, लग्न नको मला शिकायचंय… असा एक फोन आला आणि चाईल्ड लाईनने रोखला ‘तिचा’ बालविवाह | पुढारी

‘मॅडम, लग्न नको मला शिकायचंय... असा एक फोन आला आणि चाईल्ड लाईनने रोखला 'तिचा' बालविवाह

पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे तुळशी लग्नाच्या पूर्वसंधेला बालविवाह रोखून पोलिस, पंचायत समिती व चाईल्ड लाईन संस्थेने शनिवारी एका मुलीच्या जीवनाची होणारी ससेहोलपट रोखली. ‘मॅडम, मला शिकायचंय… एक मुलगा मला त्रास देतोय… म्हणून मम्मी-पप्पा मला शाळेत पाठवायला तयार होत नाहीत. त्यांना माझे लग्न लावायचे आहे. खूप भीती वाटतेय मॅडम…,’ असा फोन चाईल्ड लाईनला येतो आणि मग सुरू होतात प्रयत्न त्या मुलीला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे. काल (दि. 5) तुळशी विवाहाच्या दिवशीच चाईल्ड लाईनच्या 1098 हेल्पलाइनवर माहिती मिळाली.

पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आणि 19 वर्षे वयाच्या मुलाचा विवाह एका तासात होऊ शकतो, अशी माहिती मिळताच चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी कोणताही विलंब न करता बालविवाह रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले. चाईल्ड लाईन कार्यकर्त्यांनी त्वरित पाथर्डी पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलिस पथक पाठविण्यात आले. तेथील ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

मुलाचे आणि मुलीचे वयाचे दाखले पाहून मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री करून हा बालविवाह रद्द करण्याच्या लेखी दिल्यानंतर हा बालविवाह रोखला गेला. बालविवाहात सामील होणार्‍या अल्पवयीन मुला-मुलीचे आई-वडील, नातेवाईक, ब्राह्मण, मंडपवाले आदींना बालकल्याण समितीसमोर 7 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याच्या नोटिसा देऊन हजर होण्यास सांगितले. आम्ही विवाह करीत नव्हतो, तर साखरपुडा करीत असल्याचे नातेवाईकांनी पथकाला सांगितले.

Back to top button