पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूसह चेन्नईत पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी चेन्नईच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये एका ४५ वर्षीय महिलेचा तर ५५ वर्षीय व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. पुढचे आणखी दोन दिवस चेन्नई, कांचीपुरम्, तिरूवल्लूर आणि चेंगलपेट जिल्ह्यांमधील काही भागात गडगडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चेन्नईमध्ये मंगळवारी 8.4cm पावसाची नोंद झाली, ज्यामुळे दक्षिणेकडील शहरामध्ये 30 वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला असल्याचे सांगितले जात आहे. तामिळनाडूची राजधानी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने झोडपले आहे. रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्यामुळे रस्ते जलमय झाले. पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
मंगळवारी सुरू असलेल्या पावसामुळे चेन्नईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाले आहे. काही बसेस पावसामुळे अडकून पडल्या आहेत. तर काही ठीकाणी रस्त्यांवर झाडे पडली असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. (Chennai Rain)
अतिवृष्टीमुळे चेन्नई, रानीपेठ आणि तिरुवल्लूर येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तर वेल्लोर, कांजीपुरम, विलुपुरम आणि चेंगलपट्टू येथे शाळा बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. चेन्नईमधील कोरात्तूर येथील ईस्ट अव्हेन्यू या निवासी भागात पावसाचे पाणी शिरले आहे.