तमिळनाडूच्या राजकीय पटलावर अभिनेत्यांचा राजकीय प्रवास संपुष्टात येत आहे का? | पुढारी

तमिळनाडूच्या राजकीय पटलावर अभिनेत्यांचा राजकीय प्रवास संपुष्टात येत आहे का?

धनश्री ओतारी : पुढारी ऑनलाईन

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी  संपली. या पाच राज्यांमध्ये तमिळनाडूची चर्चा राजकीय वर्तुळात आणि तमिळ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये विशेष चर्चा सुरू आहे. या चर्चेमागचे कारणदेखील तसेच आहे. कारण आत्तापर्यंत तमिळनाडूच्या राजकीय इतिहासाला एक सिनेमेटीक अंग आहे. तामिळनाडूचा तो एक अविभाज्य घटक आहे. असे म्हणायलाही हरकत नाही. मात्र, यंदाच्या वर्षी राजकीय पटलावर वर्षानुवर्षे सुरू असलेली हिरोगिरी कुठेच पाहायला मिळाली नाही. 

७ ऑगस्ट २०१९ मध्ये ऑगस्टला द्रमूक पक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याचं, एम .करुणानिधींचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. आणि  द्रविड चळवळ आता कदाचित पूर्वी इतकी जोमात उदयास येईल ही आशा संपुष्टात आली. एकंदरीत दक्षिणेच्या राजकारणात कार्यकर्ते जीव ओवाळून टाकतील असा नेताही आता राहिलेला नाही. अशी भावना त्यावेळी व्यक्त करण्यात येत होती. पण अखेर यंदाच्या वर्षी करुणानिधींचा मुलगा आणि वारसदार असलेला स्टालिन उदयोन्मुख नेतृत्व म्हणून तामिळी जनतेने स्विकारले.

१९६७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई हे मुख्यमंत्री बनले. त्यांनी तेव्हाच्या चित्रपटातून द्राविडियन विचारसरणीचा प्रसार होईल, हे पाहिले. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून द्रमुकचे सर्वेसर्वा झालेले एम. के. करूणानिधी हे तर चित्रपट लिहित होते. करूणानिधी यांची ओळखच कलायग्नार (कलाकार) अशी होती. त्यांनी १९६९ ते २०११ या काळात चार वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले.

तमिळी चित्रपटसृष्टीतील बडे प्रस्थ असलेल्या अभिनेता एम. जी. रामचंद्रन (एमजीआर)  यांनी स्वतःचा अण्णाद्रमुक पक्षच काढला. १९७७-१९८७ या काळात ते दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. तर त्यांची पत्नी अभिनेत्री जानकीदेवी यांनाही अण्णाद्रमुकतर्फे एकदा मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यानंतरच्या काळात एमजीआर यांच्या शिष्या आणि अभिनेत्री जयललिता यांनी १९९१ ते २०१६ या काळात पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. अशा पद्धतीने १९६७ पासून आत्तापर्यंतच्या ५३ वर्षांच्या काळात तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद हे चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तीकडेच होते. जयललितांच्या मृत्यूनंतरही पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी ती परंपरा खंडीत केली असली तरी त्यांना जयललितांचे मुख्यमंत्रीपद त्यांच्या मृत्यूनंतर आयते मिळाले होते. त्या तुलनेत एम. के. स्टॅलिन हे द्राविडी राजकारणाचे पहिले गैरफिल्मी नायक ठरतात.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी द्रमुक-काँग्रेस आघाडीने राज्यात चांगली कामगिरी केली होती. त्याची पुनरावृत्ती करण्यात आघाडीला यश आले आहे. द्रमुकच्या अनेक नेत्यांवर गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते. त्या मळभातून हळूहळू बाहेर येण्यात द्रमुकला यश येत आहे. दीर्घकाळापासून राजकारणात असलेल्या स्टॅलिन यांना पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदावर बसण्याची संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या स्टॅलिन यांच्या रूपाने तामिळनाडूला नवे नेतृत्व लाभणार आहे.

खरंतर इथेच तमिळनाडूचे राजकारण सिनेमेटिक अंगातून बाहेर पडले असे म्हणायला हरकत नाही. कारण, तमिळनाडूच्या अनेक राजकीय नेत्यांप्रमाणे स्टॅलिन यांनीही चित्रपटसृष्टीचा मार्ग चोखाळला आहे. पण वडिलांप्रमाणे म्हणा किंवा यापूर्वीच्या नेत्यांप्रमाणे स्टॅलिन यांना सिनेमेटिक पडद्यावर जादु दाखवतला आली नाही. बहुदा स्टॅलिन यांना सिनेमेटिक पडद्यावर अधिक रस नसावा. 

कारण  एम. करुणानिधी यांनी जानेवारी २०१३ मध्येच स्टॅलिन यांना आपले उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. शिवाय २०१७मध्ये द्रमुकच्या कार्यकारी अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडूत स्टॅलिन यांचा मोठा भाऊ एमके अलागिरी यांची करुणानिधी यांनीच पक्षातून हकालपट्टी केली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. २०१६ पासून पक्षासंदर्भातील सर्व निर्णय स्टॅलिन घेत आहेत आणि वर्तमानात पक्षावर त्यांचीच मजबूत पकड आहे.

चेन्नईचे महापौरपद तसेच २००९ ते २०११ या काळात राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांनी सांभाळले आहे. तेव्हापासून दक्षिणेत हातपाय पसरण्याचा प्रयत्न करणारा भाजप, शशिकला यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरन् यांचा पक्ष, अण्णाद्रमुक आणि रजनीकांत यांचा पक्ष अशा सगळ्यांशी सामना करून द्रमुकला पुन्हा सत्तेवर आणण्याचे आव्हान स्टॅलिन यांच्यासमोर होते. त्यांनी स्विकारत यंदाच्या निवडणुकीत ते  पुर्ण केले. 

एका लेखात करुणानिधींच्या जाण्याने एका बदलाची सुरूवात होण्याची शक्यता वर्तण्यात आली होती. अगदी तसेच घडत गेले असे म्हटले तरी चालेल,  अनेकांना वाटत होतं की, हा अभिनेता राजकारणातील नेता बनेल. तामिळनाडूचा इतिहास हा आहे की, कोणताही मोठा सुपरस्टार तेथील सत्तेचा ‘किंग’देखील ठरू शकतो. पण, इथे सिनेमेटिक वलय असणारे येथील राजकारण सपुष्टात येत आहे. 

द्रमुकचे धुरंधर नेते करुणानिधी तसेच अ. द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या निधनापश्चात झालेल्या या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते. कारण या दोन्ही लोकप्रिय असणाऱ्या राजकारण्यांनतर जादुई पडद्यावरील लोकप्रिय नेते म्हटलात तर नजरेसमोर सिनेस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांचे चेहरे समोर आले. 

रजनीकांत तर नव्वदच्या दशकापासून राजकारणात येण्याचे संकेत देत होते. कमल हासन मात्र तेव्हा राजकारणापासून दूर राहिले होते.  असे असले तरी , रजनीकांत आणि कमल हासन यांनी जवळपास एकाच वेळी राजकारणात पाऊल टाकले. रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी राजकारणात येण्याची घोषणा केली. आणि कमल हसन यांनी २१ फेब्रुवारी २०१८ रोजी मदुराई येथे एका मोठ्या सभेला संबोधित करताना कमल हासन यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली.

रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या घोषणेमुळे काही काळ तामिळनाडूच्या राजकारणात नव्या समीकरणाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यांनी राजकारण आपला प्रांत नसल्याचे जाहीर केल्याने चित्रपटातील राजकीय पडद्यावर असणारे एक वलय कमी झाले. 

पण कमल हसन यांनी आपले वलय कायम ठेवण्यात प्रयत्न केला मात्र, तो यंदाही फसला. कमल हसन यांचा कोईंबतुर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. मतमोजणीच्या सुरुवातीपासून कमल हसन आघाडीवर होते, मात्र अखेरिस भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी त्यांना मागे टाकत विजय मिळवला. त्यापूर्वी, नवीन पक्षाची घोषणा केल्यानंतर लगेचच त्यांनी  २०१९ ची लोकसभा निवडणुकही लढवली. मात्र, त्यांना एकाही मतदारसंघात विजय मिळवता आला नाही. हे सर्व पाहता तमिळनाडूच्या राजकारणाला असलेले सिनेमॅटिक वलय कुठेतरी संपुष्टात येत आहे. असे म्हणायला हरकत नाही. 

Back to top button