‘या’ जिल्ह्यांना केंद्राचा आदेश : पाकिस्‍तानसह ३ देशांमधील अल्पसंख्याक हिंदूंना मिळणार भारतीय नागरिकत्व | पुढारी

'या' जिल्ह्यांना केंद्राचा आदेश : पाकिस्‍तानसह ३ देशांमधील अल्पसंख्याक हिंदूंना मिळणार भारतीय नागरिकत्व

पाकसह ३ देशातील अल्पसंख्याक हिंदूंना मिळणार नागरिकत्व

पुढारी ऑनलाईन – केंद्रीय गृह मंत्रायलाने गुजरातमधील मेहसाना आणि आनंद या दोन जिल्ह्यात पाकिस्तान, बंग्लादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याक हिंदूंना आणि इतर काही धर्माच्या लोकांना नागरिकत्व देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हिंदूंसह, शिख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन या धर्मियांना नागरिकत्व दिले जाणार आहे. (Citizenship to minority Hindus of Pakistan, Afghanistan, Bangladesh)

सोमवारी हे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकत्व कायदा १९५५ नुसार हे आदेश देण्यात आले आहेत. आनंद आणि मेहसाना जिल्ह्यात राहात असलेल्या या समुदायातील लोकांसाठी हे आदेश काढण्यात आले आहेत. या अल्पसंख्याकांना नागरिकत्वासाठी अर्ज दाखल करावा लागणार आहे, त्यानंतर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करून नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देतील.

द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी अहमदाबादमध्ये ४० पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. २०१७पासून अहमदाबादमध्ये १०३२ पाकिस्तानातून भारत आलेल्या लोकांना नागरिकत्व दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. २०१६ आणि २०१८च्या नोटिफिकेशननुसार अहमदाबाद, गांधीनगर आणि कच्छ या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचे अधिकार दिले आहेत. अफगाणिस्तान, बंग्लादेश आणि पाकिस्तानातील हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन या अल्पसंख्याकांना ते नागरिकत्व देऊ शकतात.

हेही वाचा

Back to top button