मोठी बातमी: मोरबी पूल दुर्घटनास्थळाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाहणी | पुढारी

मोठी बातमी: मोरबी पूल दुर्घटनास्थळाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाहणी

पुढारी ऑनलाईन: गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील ‘केबल ब्रिज’ अचानक तुटल्याने झालेल्‍या दुर्घटनेत मृतांची संख्या सोमवारी १३५ वर पोहोचली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी येथे घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील यंत्रनेकडून या दुर्घटनेसंदर्भात सविस्तर आढावा घेतला.

आजचा सलग तिसरा दिवस आहे. या दुर्घटनेस्थळी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. या घटनास्थळाच्या पाहणीनंतर पंतप्रधानांचा ताफा हा या दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयाकडे रवाना झाला आहे. यावेळी पंतप्रधान रूग्णालयातील जखमींची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करणार आहेत.

मोरबी पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत १३५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी ४५ जण १८ वर्षांखालील आहेत. मृतांमध्ये मुले, महिला तसेच वृद्धांचे प्रमाण अधिक आहे. १७० हून अधिक जणांना वाचविण्यात आले आहे. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली होती. ७६५ फूट लांबीचा व ४.५ रुंदीचा हा झुलता पूल अचानक तुटला, तेव्हा या पुलावर ५०० लोक होते आणि ते सर्व नदीत पडले. या दुर्घटनेस जबाबदार नऊजणांना अटक करण्यात आली आहे.

यावेळी देखील पंतप्रधान मोदींचा कंठ दाटला

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवडिया येथे भाषणाच्या सुरुवातीलाच मोरबी दुर्घटनेचा उल्लेख केला होता. यावेळी पंतप्रदान मोदी यांचा कंठ यावेळी दाटून आला होता. ते म्हणाले की, “जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. आता लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात, हाच प्रयत्न आहे.”

हेही वाचा:

Back to top button