‘चुकून चोरी झाली, मला माफ करा…’, चिठ्ठी लिहून चोरट्याने मंदिरातील सामान केले परत | पुढारी

'चुकून चोरी झाली, मला माफ करा...', चिठ्ठी लिहून चोरट्याने मंदिरातील सामान केले परत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील बालाघाटमधील लामटा येथे चोरीची अनोखी घटना समोर आली आहे. येथील जैन मंदिरात लोखो रूपये किंमतीच्या चांदीच्या वस्तूंची चोरी झाली होती. त्यानंतर चोरट्याचे मन बदलले आणि त्याने चोरलेले सर्व साहित्य मंदिराजवळ आणून टाकले. विशेष म्हणजे त्यासोबत त्याने एक चिठ्ठी लिहून माफीही मागितली आहे. चोरीनंतर मला खूप त्रास झाला आहे, यासाठी मी माफी मागतो, अशी चिठ्ठी त्याने वस्तूंवर चिटकवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लामटा येथील बाजार चौकातील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात सोमवारी (दि. २४) रात्री चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने मंदिरातील चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी यापूर्वी झालेल्या चोरीतील संशयितांनाही अटक केली. अखेर चोरट्याचे मन बदलले आणि त्याने चोरी केलेल्या सर्व वस्तू पंचायत भवनाजवळील खड्ड्यात आणून टाकल्या. जैन परिवारातील लोक जेव्हा पाणी भरण्यासाठी गेले, तेव्हा तेथील खड्यात एका बॅगमध्ये हे साहित्य सापडले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्या साहित्यासोबत एक चिठ्ठी सापडली. चोरीनंतर मला खूप त्रास झाला आहे, यासाठी मी माफी मागतो, असे त्याने त्यामध्ये म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी जप्त केलेले सर्व साहित्य मंदिराला सुपूर्द केले.

दिगंबर जैन पंचायतचे अध्यक्ष अशोक कुमार यांनी सांगितले की, मंदिरातील चोरी झालेले सर्व वस्तू पाण्याच्या नळाजवळ मिळाल्या आहेत. त्यानंतर सर्व वस्तू वाजत गाजत मंदिरात नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय डाबर यांनी चोरट्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button