पाकिस्तानचे वस्त्रहरण | पुढारी

पाकिस्तानचे वस्त्रहरण

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या मुंबईत ताज हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत भारताने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडताना साजिद मीर या दहशतवाद्याची ऑडिओ क्लिप सादर केली. मुंबई आणि पाठोपाठ दिल्लीत झालेल्या समितीच्या बैठकीत प्रामुख्याने भारतातील दहशतवादी कारवायाच केंद्रस्थानी राहिल्या आणि त्यासंदर्भाने भारताने पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांचा पाठिंबा जगासमोर उघडा केला. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या हॉटेल ताजमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक होण्याला एक ऐतिहासिक महत्त्व होते.

मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला चौदा वर्षे झाली असली तरी हल्ल्याच्या जखमा अजून भरलेल्या नाहीत. या जखमा मुंबईवरच्या आहेत, देशावरच्या आहेत. एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही भारताने जगासमोर धीरोदात्तपणाचे दर्शन घडवले. एखाद्या आत्मघातकी हल्ल्यातील दहशतवाद्याला जिवंत पकडण्याची घटनाही याच हल्ल्यावेळी घडली होती. मुंबई पोलिस दलातील तुकाराम ओंबाळे यांच्या अतुलनीय साहसामुळे अजमल कसाबला पकडण्यात आले आणि त्यामुळे पाकिस्तानला जगासमोर उघडे करणे भारताला शक्य झाले.

दहशतवादी जिवंत सापडल्यानंतरही भारताने कायदेशीर प्रक्रिया नीटपणे राबवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली. एवढे सगळे होऊनही पाकिस्तानने हल्ल्यासंदर्भातील आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. शिवाय हल्ल्याशी संबंधित गुन्हेगारांवर कारवाईस टाळाटाळ केली. किंवा कारवाईचे नाटक करून त्यांना मोकळे सोडले. मुंबईत झालेल्या बैठकीत भारताने तो विषय चर्चेत आणला. हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी, साजिद मीर, अब्दुल अल काफा, अब्दुल अजीज आदी दहशतवाद्यांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे सांगितले. पाकिस्तानमध्ये राज्यकर्ते कुणीही असले तरी त्यांच्याकडे कोडगेपणा एवढा असतो की, अशी कोणतीही गोष्ट ते कधी मान्य करीत नाहीत. त्यामुळे भारताने समोर आणलेल्या या गोष्टी त्यांनी मान्य करणे शक्य नव्हते.

मुंबईनंतर दुसर्‍या दिवशी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारताने केलेल्या सगळ्या आरोपांचा इन्कार करताना पाकिस्तानने 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए-तोयबाच्या सहभागासंदर्भात भारताने पुरावे द्यावेत, असे म्हटले आहे. ठार झालेले सगळे दहशतवादी तसेच जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी हे सगळे पाकिस्तानचे रहिवासी असल्याचे अनेक पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे, तरीसुद्धा नव्याने पुराव्यांची मागणी करणे म्हणजे निर्लज्जपणाची हद्द म्हणावी लागेल. यावरून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याची तेथील राज्यकर्त्यांची भूमिका सातत्याने समोर येते. आताही त्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला गेला, इतकेच.

मुंबईत झालेल्या बैठकीतील महत्त्वाचा भाग ठरला तो म्हणजे साजिद मीर याच्या ऑडिओ क्लिपचे सादरीकरण. या क्लिपमध्ये साजिद मीर दहशतवाद्यांना नरिमन हाऊसच्या टेरेसवर फिरणार्‍या लोकांना लक्ष्य करण्याची सूचना देत आहे. ‘जिथे तुम्हाला हालचाल दिसेल तिथे हल्ला करा. कुणी टेरेसवर फिरत असेल, येत-जात असेल तर फायर करा…’ असे तो दहशतवाद्यांना सांगत आहे. पाकिस्तानने कारवाई न करता मोकळे सोडलेल्यांमध्ये या साजिद मीरचेही नाव आहे. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदसह मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

उलट पाकिस्तानने त्यांना संरक्षण दिले असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बैठकीत म्हटले. मुंबई हल्ल्यातील एका दहशतवाद्याला (अजमल कसाब) जिवंत पकडण्यात आले आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली; पण 26/11 च्या हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार अजूनही सुरक्षित असून, त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. मुंबईवरील हल्ला हा केवळ मुंबईवरील नव्हता, तर आंतरराष्ट्रीय समुदायावरील हल्ला असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितले आहे. दहशतवादविरोधी समितीच्या विशेष बैठकीत परराष्ट्रमंत्र्यांनी पाकचा पाठीराखा चीनचाही खरपूस समाचार घेतला.

दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अपयशी ठरली. कारण, पाकिस्तानी दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांना अनेक वेळा चीनने अडथळे आणल्याचे जाहीरपणे सांगितले. ही बैठक 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या मुंबईकरांना श्रद्धांजली ठरणार असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे.

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देशांनी राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन एकत्र यायला हवेे, असे जयशंकर यांनी केलेले आवाहन औचित्यपूर्ण आहे. दहशतवाद्यांना उत्तरदायी ठरविण्यात आणि त्यांना न्यायालयाच्या पिंजर्‍यात उभे करताना आंतरराष्ट्रीय समुदाय एकजुटीने प्रयत्न करेल, अशी ग्वाही जगाला देण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. संपूर्ण जग दहशतवादाने त्रस्त असल्याची आम्हाला कल्पना आहे; परंतु इतरांच्या तुलनेत भारताने त्याची अधिक किंमत चुकवली आणि त्याचमुळे भारताला त्याचे पुरेसे गांभीर्य आहे. जयशंकर यांनी समितीसमोर दहशतवादाच्या बीमोडासाठीची पंचसूत्रीही सादर केली.

संयुक्त राष्ट्रांमध्ये आर्थिक कार्यगट स्थापन करणे, सुरक्षा परिषदेचे कामकाज प्रभावी आणि पारदर्शी बनवणे, दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, दहशतवादी आणि त्यांच्या पुरस्कर्त्यांवर कठोर कारवाई करणे, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील संबंधांचे जाळे उद्ध्वस्त करणे, दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आभासी चलनासारख्या गोष्टींवर मर्यादा घालणे आदी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. जागतिक पातळीवरील दहशतवादाच्या समस्येवरील चर्चेबरोबरच पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करण्यात या बैठकीने महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तान त्यातून कोणते शहाणपण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित राहणार असला तरी भविष्यात त्याला त्याची किंमत चुकवावी लागावी यासाठी बैठकीतील भारताची ठोस भूमिका आणि त्यास असलेला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा अधोरेखित झाला हे महत्त्वाचे.

Back to top button