एकाच घरात दिवसा झाली दुसर्‍यांदा चोरी ;भुतेटाकळीत एक चोरटा पकडला | पुढारी

एकाच घरात दिवसा झाली दुसर्‍यांदा चोरी ;भुतेटाकळीत एक चोरटा पकडला

कोरडगाव : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी येथे एकाच शेतकर्‍याच्या घरात भरदिवसा दुसर्‍यांदा चोरीचा प्रकार घडला. दुसर्‍यावेळी या शेतकर्‍याने एका चोराला रंगेहाथ पकडले. मात्र, त्याचे दोन साथीदार पळून गेले. राष्ट्रीय महामार्गालगत राहत असलेल्या तुकाराम नाथा फुंदे यांच्या घरी भरदिवसा चोरी करून मोठा ऐवज लंपास करण्याची घटना दोन-तीन महिन्यापूर्वी घडली होती. याच ठिकाणी शनिवारी (दि.29) दुपारी त्यांच्या घरातच चोरी करण्याचा प्रकार घडला.

शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घरची कामे उरकून शेतातील कामे करण्यासाठी तुकाराम फुंदे व त्यांच्या घरचे गेले होते. घराला कुलूप पाहून महामार्गावरून जाणार्‍या चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व पेटीत असणारा ऐवज लंपास केला. मात्र, शेतात काम करत असलेल्या तुकाराम फुंदे यांना याबाबत फोन आल्याने त्यांनी घराकडे धाव घेत एका चोराला रंगेहाथ पकडले. बाकी दोन जणांनी पलायन केले. पाथर्डीच्या पूर्व भागात भरदिवसा चोरीचे प्रकार वाढले आहेत.

शेतकरी शेतात कामाला गेल्याचा फायदा उठवून दिवसा चोरी करण्याचा नवीन फंडा चोरांनी अवलंबला आहे. या घटनेची माहिती पाथर्डी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन चोरट्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सोमीनाथ बांगर हे करीत आहेत.

Back to top button