

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गुजरातमधील वडोदरा येथे आगामी काळात एअरबस सी-२९५ वाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण खात्याचे सचिव अजय कुमार यांनी आज (दि. २७) पत्रकारांशी बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन ३० आक्टोबरला केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एअरबस ही युरोपमधली आघाडीची विमान निर्मिती कंपनी आहे. सी-२९५ या प्रकारातील विमानांची निर्मिती पहिल्यांदाच युरोपच्या बाहेर होत आहे. एअरबस आणि टाटा ऍडव्हान्सड सिस्टीम्स (टीएएसएल) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. हवाई दलाला लागणाऱ्या सी-२९५ विमानांशिवाय अतिरिक्त विमाने बनविण्याची क्षमता वडोदरा येथील प्रकल्पात असेल. ५६ एअरबस सी-२९५ विमानांच्या खरेदीचा व्यवहार सप्टेंबर २०२१ मध्ये भारताने केला होता. सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार होता. सध्या हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या अव्हरो -७४८ विमानांची जागा सी-२९५ वाहतूक विमाने घेणार आहेत, असेही संरक्षण खात्याचे सचिव कुमार यांनी सांगितले.
कराराचा भाग म्हणून पहिली १६ विमाने स्पेनमध्ये बनवून ती भारताला दिली जाणार आहेत. तर बाकीच्या ४० विमानांची निर्मिती व बांधणी भारतात केली जाणार आहे. भारतातील प्रकल्पासाठी एरोनॉटिकल क्वालिटी एशोरेंन्स महासंचलनालयाने (डीजीएक्यूए) अलीकडेच परवानगी दिली होती.
हेही वाचा :