Covishield vaccine | लोक कोरोनाला कंटाळले, बूस्टर डोसही नको, कोव्हिशिल्डचे १० कोटी डोस टाकून दिले : अदर पूनावाला | पुढारी

Covishield vaccine | लोक कोरोनाला कंटाळले, बूस्टर डोसही नको, कोव्हिशिल्डचे १० कोटी डोस टाकून दिले : अदर पूनावाला

पुणे : पुढारी ऑनलाईन; सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी कोव्हिशिल्ड लसी संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोव्हिशिल्ड लसीचे (Covishield vaccine) उत्पादन थांबवले. त्या वेळी स्टॉकमध्ये असलेले सुमारे १० कोटी डोस (100 million doses) कालबाह्य झाल्यानंतर टाकून देण्यात आले, असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

“डिसेंबर २०२१ पासून आम्ही कोव्हिशिल्ड उत्पादन थांबवलं. बूस्टर डोसला मागणी नाही. कारण लोक आता कोरोनाला कंटाळले आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मीदेखील याला कंटाळलो आहे. आम्हा सर्वाना हे आता नको आहे,” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. डेव्हलपिंग कंट्रीज व्हॅक्सीन मॅन्यूफॅक्चर्स नेटवर्क (DCVMN) च्या तीन दिवसीय वार्षिक सर्वसाधारण परिषदेला गुरुवारी पुण्यात सुरुवात झाली. यादरम्यान पूनावाला यांनी कोव्हिशिल्ड लसीच्या (Covishield vaccine) उत्पादनाबद्दल माहिती दिली.

Covovax ही Serum Institute of India ने विकसित केलेली नवीन लस आहे. ही लस मिश्रित बूस्टर पद्धतीची असेल. पूनावाला पुढे म्हणाले की, “आता, कोवोव्हॅक्सला दोन आठवड्यांत परवानगी मिळायला हवी. जेव्हा लोक दरवर्षी फ्लूची लस घेतात, तेव्हा ते सोबत कोविड लस घेऊ शकतात. पण भारतात दरवर्षी फ्लूची लस घेण्याची पद्धत नाही.”

ओमायक्रॉन स्ट्रेन विरूद्ध लस विकसित करण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रयत्नांबद्दल बोलताना पूनावाला म्हणाले, की आम्ही अमेरिकेच्या नोव्हावॅक्ससोबत ओमायक्रॉन-विशिष्ट बूस्टरसाठी भागीदारी करत आहोत. ही एक द्विसंवेदी लस असणार आहे. आमच्या कोवोव्हॅक्स बूस्टर डोसच्या परिणामकारकतेसाठी चाचण्या झाल्या आहेत. येत्या १०-१५ दिवसांत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट अमेरिकेच्या Codagenix च्या सहकार्याने सिंगल डोस असलेली इंट्रानासल कोविड लसदेखील विकसित करत आहे.

१०० टक्के लसीकरणाची गरज

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की कोरोनाचे नवीन व्हेरियंट येत असल्याने आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना आणि असुरक्षित वयोगटाला १०० टक्के लसीकरणाची गरज आहे. “ओमाक्रॉनच्या ३०० सब-व्हेरियंटमध्ये नव्याने आढळलेला XBB हा व्हेरियंट अधिक प्रतिकारशक्ती टाळणारा आहे. या सब-व्हेरियंटमुळे एक लाट येऊ शकते. नव्याने आढळून आलेल्या सब-व्हेरियंटमुळे आजाराची तीव्रता वाढून रुग्णालयात दाखल करण्याची परिस्थिती उद्भवेल, अशी कोणतीही माहिती अद्याप पुढे आलेली नाही,” असे डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या.

हे ही वाचा :

Back to top button