

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : एपीएमसी घाऊक फळ मार्केटमध्ये आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एन विंगमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीत बाहेर असलेले पुठ्ठे, खोक्यांच्या साठ्याला आग लागली. सिगारेट न विझवता तशीच फेकून दिल्याने ही लागल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल दिड तास आगीचा धुराळा सुरू होता. यामुळे आठ गाळेधारकांचे नुकसान झाले. (Cigarette burning)
एपीएमसी फळ मार्केटमध्ये एन विंगमध्ये पुठ्ठ्यांच्या आणि खोक्यांचा ढिगाला आग लागली. गुरूवारी (दि. १७) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत नऊ परवानाधारक विक्रेत्यांचे चार ते पाच लाख रिकामे पुठ्ठे आणि लाकडी खोके जाळून खाक झाले. या आगीची तीव्रता अधिक असल्याने नजीकच्या आठ गाळ्यांना त्याची झळ बसली आहे. या गळ्यांतील चोपड्या, संगणक आणि इतर साहित्य जाळाले आहे. फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी याबाबतची माहिती दिली. (Cigarette burning)
या आगीची तीव्रता अधिक असल्याने दिड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीची माहिती समजताच सचिव राजेश भुसारी, उपसचिव संगीता अंडागळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
एपीएमसीने आतापर्यंत ३२ जणांना अधिकृत लाकडी खोके, पुठ्ठ्यांचे बॉक्स विक्री करण्यासाठी परवाना दिला आहे. त्यातील नऊ विक्रेते हे फळ मार्केटमधील एन विंगच्या पाठीमागे आपला व्यवसाय करतात. मात्र त्याठिकाणी कोणतीही सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. मोकळ्या जागेत हा व्यवसाय सुरू असतो. यापूर्वी सुक्या गवताला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन केंद्राची नियोजित जागाही या मार्केटमध्ये निश्चित केली आहे. मात्र त्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेने एपीएमसी प्रशासनाला सांगितले. यामुळे या जागेचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जातो. याच पुठ्ठे आणि लाकडी खोके विक्रेत्यांनी मार्केटच्या बाहेर पदपथावर ही बाजार मांडला आहे.
हेही वाचा