Bengaluru rains | IT शहर बंगळूरमध्ये मुसळधारेने हाहाकार, रस्ते पाण्याखाली, अनेक वाहने वाहून गेली (पहा व्हिडिओ)

Bengaluru rains | IT शहर बंगळूरमध्ये मुसळधारेने हाहाकार, रस्ते पाण्याखाली, अनेक वाहने वाहून गेली (पहा व्हिडिओ)

बंगळूर : पुढारी ऑनलाईन; बंगळूर शहराला मुसळधार पावसाने (Bengaluru rains) पुन्हा एकदा झोडपले आहे. बेलंदूरच्या आयटी झोनसह शहराच्या पूर्व, दक्षिण आणि मध्य भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या उत्तरेकडील राजामहल गुट्टाहल्ली येथे ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बंगळूर शहरात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पाऊस सुरू झाल्यामुळे ऑफिसमधून घरी जाणाऱ्यांना मेट्रो स्टेशनवर आश्रय घ्यावा लागला. अनेकांची वाहने पाण्याखाली बुडाली. शहरातील अनेक भागात पावसाच्या पाण्याने दैना उडाली असून याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

शिवाजीनगरमध्ये पाण्यातून काही वाहने वाहून गेली आहेत. अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. तळघरातील पार्किंगमधील वाहने पाण्याखाली बुडाली असल्याचे दिसून आले आहे. काही इमारतींच्या तळघरातून पुराच्या पाण्याचा लोट वाहताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे मॅजेस्टिकजवळील भिंत कोसळली असून ज्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

गेल्या महिन्यात असाच सलग तीन दिवस पाऊस पडल्यानंतर शहराला अभूतपूर्व पुराचा सामना करावा लागला होता. शहरातील पूरस्थितीमुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. बंगळूर शहरात आयटी कंपन्या आणि घरगुती स्टार्ट-अप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना पावसाचा फटका बसला होता. रस्ते पाण्याखाली गेल्याने आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागला होता.

पावसाने सर्व रेकॉर्ड मोडले

IT शहर असलेल्या बंगळूरने यावर्षी पावसाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. शहरात यंदा आतापर्यंत १८०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. २०१७ मध्ये शहरात १,६९६ मिमी पाऊस झाला होता. (Bengaluru rains)

हे ही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news