सह्याद्रीच्या कुशीत ढगफुटीसदृश पाऊस; वाल्हे येथील ओढ्याला पूर | पुढारी

सह्याद्रीच्या कुशीत ढगफुटीसदृश पाऊस; वाल्हे येथील ओढ्याला पूर

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: पिंगोरी, कवडेवाडी, दौंडज (ता. पुरंदर) खोर्‍यांमध्ये बुधवारी (दि. 13) पहाटे ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतामधील उभी पिके वाहून गेली. तसेच पूल व रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बहुतांशी ठिकाणची बाजरी, ऊस पिके जमीनदोस्त झाली. तर अनेक ठिकाणी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पिंगोरी, कवडेवाडी, आडाचीवाडी, बापसाईवस्ती, हरणी, मांडकी, जेऊर, पिसुर्टी, गायकवाड मळा या ठिकाणी पुलाखाली पाणी बसले नसल्यामुळे अनेक पुलांच्या बाजूने पाणी वाहून जाऊन पुलांचे, भरावांचे नुकसान झाले आहे.

वाल्हे परिसरात सोमवार, मंगळवार, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील सोयाबीन, सूर्यफूल, मका, बाजरी, तूर, भुईमूग यासह झेंडूची फुले, फळबागांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिकांवर अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला असून शेतातील पाणीच निघत नसल्याने अनेक पिके वायाला गेली आहेत. शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

मागील दोन दिवस झालेल्या पावसाने व बुधवारी पहाटे ढगफुटीसदृश पावसाने वाल्हे गावात जाणार्‍या दोन पुलांवरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्याने अनेकांची गैरसोय होऊन पिंगोरी, हरणी, मांडकी, परिंचे, वाल्हे गावात जाणारा रस्ता बंद झाला होता. अनेक कामगार, प्रवाशी, विद्यार्थिनींसह अनेकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला असून मोठी वाहने दुपारपर्यंत अडकून राहिली होती.

दरम्यान वाल्हे तसेच परिसरातील दौंडज, पवारवाडी, वागदरवाडी, बहिर्जिचीवाडी, बाळाजीचीवाडी, अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, गायकवाडवाडी आदी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दौंडज गावचे पोलिस पाटील दिनेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य विक्रम फाळके, शेतकरी भगवंत कदम, तसेच परिसरातील शेतकरीवर्गाने केली आहे.

Back to top button