पुण्यात सोमवारी आक्राळ विक्राळ पाऊस का झाला? ही आहेत नेमकी कारणे... जाणून घ्या सविस्तर | पुढारी

पुण्यात सोमवारी आक्राळ विक्राळ पाऊस का झाला? ही आहेत नेमकी कारणे... जाणून घ्या सविस्तर

आशिष देशमुख

पुढारी ऑनलाईन: पुणे शहराला सोमवारी रात्री अचानक मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे सणासुदीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह, पेठांमधील दुकानदार यांच्यासह स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. पावसामुळे अनेकांच्या गाड्या बंद पडत असल्यामुळे लहान मुलांना साेबत घेऊन जाताना कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली हाेती. या पावसाने रस्त्यांवर फक्त पाणी आणि पाणीच अशी अवस्था होती. क्युमुनोलिंबस (बाष्पयुक्त ढग) ढगांच्या आकाशात 11 किलोमीटरचा डोंगर तयार झाल्यानेच ढगांची घनता खूप वाढून भार पाण्याचा भार जास्त होताच शहरावर कोसळधार सुरु झाली ती उत्तर रात्री पर्यंत सुरु होती. पण सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडला की, सोमवारी एवढा पाऊस पुण्यात का पडला? चला तर मग जाणून घेऊयात याची सविस्तर कारणे –

सोमवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी सहाच्या सुमारास हलक्या सरी बरसल्या. मात्र, काही भागातच हा पाऊस होता. मात्र, रात्री 9.40 वाजता पावसाला सुरूवात झाली.हवामान विभागाने पहिला अलर्ट सांकाळी 7.30 वाजता दिला.त्यात शहरावर क्युमुनोलिंबस (अतिबाष्पयुक्त)ढगांची गर्दी झाल्याचा अलर्ट दिला.दुसरा अलर्ट रात्री 9 तर तिसरा अलर्ट रात्री दहा वाजता देण्यात आला.

नेमकी कारणे काय..

शहरावर कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने अरबी समुद्राकडून शहराकडे बाष्पयुक्त ढगांची गर्दी झाली. शहराच्या आकाशात 11 किलोमिटर लांबीचे काळे ढग दाटून आले. त्यांची घनता वाढली व पाण्याचे वजन वाढल्यामुळे कोसळधार सुरु झाल्या. त्यामुळे पावसाचे थेंबही पटोरे होते आणि वेगही जास्त होता.

सोमवारी शहरांवर 996 हेक्टा पास्कल इतका कमी हवेचा दाब झाल्याने बाष्पयुक्त ढग अरबी समुद्राकडून वेगाने पुणे शहर व जिल्ह्याच्या दिशेने मात्र शहरांवर हवेच दाब त्याही पेक्षा कमी होत गेल्याने ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अति मुसळधार पाऊस झाला. हवेतील आद्रता 70 टक्क्यांवरून थेट 98 टक्क्यांवर गेल्यानेदेखील प्रचंड पाऊसाची नोंद झाली.

आगामी 24 तास अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी रात्री 10.30 ला अतिवृष्टीचा इशारा दिला. ते म्हणाले की, पुणे, मुंबई येथील मान्सूनचा प्रवास संपण्याऐवजी अधिक लांबणार आहे.

पुण्यावर 11 किलीमीटर उंच ढग

पुणे वेधशाळेचे प्रमुख कश्यपी यांनी सांगितले की, पुण्यावर क्युमुनोलिंबस प्रकारच्या ढगांची (थंडरक्लाऊड) गर्दी झाली होती. या ढगांची उंची 11 किलोमीटर असल्याने पावसाचा वेग प्रचंड होता. या ढगांचे चित्र रात्री 9.49 ला रडारच्या सहाय्याने टिपण्यात आले. त्यानुसार जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पुरंदर, खंडाळा, वेल्हे, महाबळेश्वर, भोर, कोरेगाव, फलटण सह पुणे व पिंपरी-चिंचवड या भागाला ढगांनी घेरले होते.

शॉर्टसर्कीटने लाईट गुल; अनेक भागात झाडपडी

रात्री पावसाचा जोर इतका होता की, शहरातील येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड या भागात पाणी शिरले. तसेच, सोमवार पेठेत शॉर्ट सर्कीटने वीज पुरवठा खंडीत झाला. स्टेशन रोड, कात्रज कोंढवा परिसर या भागातही वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या तक्रारी आल्या. रात्री 9.40 ला सुरू झालेला पाऊस एकाच वेगाने रात्री 12 पर्यंत पडत होता.त्यांनतर पुन्हा रात्री 2 पर्यंत काही भागात पाऊस सुरुच होता नागरिकांनी पावसाचे आपापल्या घरातून फोटो काढत सोशल मिडीयावर व्हायरल केले. तर हडपसर, आकाशवाणी जवळ झाडपडी झाली.

सोमवारी शहरात क्युमुनोलिंबस प्रकारच्या ढगांची खूप दाटी झाली होती. अकाशात सुमारे 11 किमी लांब इतक्या उंचीचे ढगांचे थर होते. त्यामुळे पावसचा जोर जास्त होता. मात्र हा पाऊस तीन तासांत 90 मी मी इतका झाल्याने याला ढग फुटी म्हणता येणार नाही. पहाटे 5 पर्यंत शहरात 105 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली. ऑक्योबर 2019मध्ये इतका 181 मीमी इतका पाऊस झाला होता. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2022 रोजी गेल्या पाच वर्षातला दुसरा विक्रमी पाऊस झाला आहे.
-अनुपम कश्यपि,हवामान वभाग प्रमुख,पुणे वेधशाळा

Back to top button