पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएसआयच्या ‘टार्गेट’वर; गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट जारी | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएसआयच्या 'टार्गेट'वर; गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट जारी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. अलर्टनूसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे गुप्तचर यंत्रणेकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधानांवर हल्ला करण्यासाठी सभा किंवा रोड शोमध्येही दहशतवादी घुसू शकतात अथवा पोलिसांच्या गणवेशातही पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी आत्मघाती हल्ला करू शकतात, अशी भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे संभाषण रेकॉर्ड केल्यानंतर ही माहिती सुरक्षा यंत्रणाच्या हाती लागल्याचे कळतेय. या अलर्टनंतर पंतप्रधान मोदींची सुरक्षा वाढवली जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मोदींवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा, इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने लष्कर-ए-तैयबाला भारतातील सर्व बड्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. यासोबत सणासुदीच्या काळात बाजारांना देखील दहशवाद्यांकडून लक्ष केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्ववभूमीवर दिवाळीपूर्वी राजधानी दिल्लीसह इतर महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button