हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान | पुढारी

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीर, 'या' तारखेला मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली आहे. हिमाचल विधानसभेसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार असून अनेक पोल्सच्या अंदाजानुसार ही निवडणूक चुरशीची होणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांच्या निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या निवडणुकांवर लागून राहिले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये ६८ जागांसाठी निवडणूक होणार असून ३५ जागांवर बहुमत सिद्ध होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपला ४४, काँग्रेसला २१, सीपी (एम) ला १ तर इतर २ असे पक्षीय बलाबल होते. २०२१ मध्ये ३ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप हरली होती. त्यामुळे याठिकाणी चुरशीची निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १७ ऑक्टोबर रोजी काढली जाईल. २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येतील तर २७ तारखेला अर्जांची छाननी केली जाणार आहे. २९ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडेल आणि त्यानंतर ०८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. हिमाचल प्रदेशातील बहुतांश भाग डोंगराळ असल्याने विशेष परिस्थितीमध्ये मतदारांसाठी मतदानाकरिता वाहन व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. याशिवाय ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोविड बाधित तसेच दिव्यांगांना घरातूनच आपले मत देण्याची सुविधा दिली जाणार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

हिमाचलमध्ये शंभर अथवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ११८४ इतकी आहे, असे सांगून राजीव कुमार पुढे म्हणाले की, राज्यातील एकूण मतदारांची संख्या ५५ लाख इतकी आहे. यातील पुरुष मतदारांची संख्या २७ लाख ८० हजार तर महिला मतदारांची संख्या २७ लाख २७ हजार इतकी आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ६७ हजार ५३२ इतकी राहील. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या १ लाख २२ हजार इतकी आहे. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावरच राहतील तर सर्व लोकांना ते राहत असलेल्या ठिकाणपासून दोन किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात मतदान केंद्र देण्याचा प्रयत्न राहणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती आयोगाकडून प्रसारित केली जाणार आहे.

लवकरच जाहीर होणार गुजरातचा निवडणूक कार्यक्रम

हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा एकत्र केली जाईल, असे मानले जात होते. मात्र निवडणूक आयोगाने केवळ हिमाचलच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक आयोगाचे अधिकारी गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहे. यासाठी अधिकारीवर्ग गुजरातला जाणार आहे. आढावा बैठका संपल्यानंतर गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

हे वाचलंत का?

Back to top button