शेवगाव : 12 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हालचाली , यंदा दिवाळीचा गोडवा वाढण्याची मतदारांना आस

शेवगाव : 12 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी हालचाली , यंदा दिवाळीचा गोडवा वाढण्याची मतदारांना आस

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी स्थानिक पुढार्‍यांची हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे दिवाळीचा गोडवा वाढण्याची मतदारांत अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र, या निवडणुका होतील कि पुढे ढकलतील, याबाबत अद्याप सभ्रंमावस्था व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेबंर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला असून, 13 ऑक्टोबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि.18 ऑक्टोबरपर्यंत हरकती व 21 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायत निवडणुका होतील, असे गृहित धरून स्थानिक नेतेमंडळींची धांदल सुरु झाली आहे.

तालुक्यात पहिल्या टप्प्यात अमरापूर, आखेगाव ति, भायगाव, प्रभूवाडगाव, कुरुडगाव रावतळे, जोहरापूर, रांजणी, दहिगाव-ने, वाघोली, सुलतानपुर खु, खामगाव, खानापूर या 12 ग्रामपंचायतींची मुदत पुढल्या महिन्यात संपत असल्याने त्या निवडणुकीस पात्र आहेत. एक-दोन महिन्यांत निवडणुका होतील, असा अंदाज बांधून येथील इच्छुकांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या या नेत्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागल्याने गावातील मतदारांना आता वेगवेगळे आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवाळीला गोडवा येण्यास ही नामी संधी चालून आल्याचा फायदा घेत मतदार इच्छुकांना हरभर्‍याच्या झाडावर चढवित आहेत.

बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी 14 सप्टेंबरला प्रारूप यादी प्रसिद्ध करुन हरकतीनंतर 7 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 29 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचे सदस्य मतदार असतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका झाल्यास बाजार समितीस आपल्या मतदारयाद्या बदलाव्या लागणार असल्याने बाजार समिती अथवा ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलतील, असे तर्क वितर्क काढले जात असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

सरपंचपदाच्या इच्छुकांची धामधूम
निवडणुका कधी होतील, याचा विचार न करता काहींना सरपंच पदाची स्वप्न पडत असल्याने त्यांनी गावात धामधूम सुरू केली आहे. शेतकरी मतदार उत्पन्न नसल्याने दीपावली सणाला अडचणीत आला आहे. मात्र, पारावर गप्पा ठोकणारे ठक इच्छुक उमेदवारांकडून सणाला काही सहकार्य मिळण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news