कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीतील गावांत निवडणुकांचे धूमशान | पुढारी

कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीतील गावांत निवडणुकांचे धूमशान

कोल्हापूर, अनिल देशमुख : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत समावेश असलेल्या गावांतच ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान होणार आहे. या गावांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. येत्या महिन्याभरात या गावांच्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे शहराची हद्दवाढ पुन्हा साशंकतेच्या भोवर्‍यात सापडली आहे.

कोल्हापूर महापालिकेची 1972 मध्ये स्थापना झाली. यानंतर महापालिकेच्या क्षेत्रात एकदाही इंचभरसुद्धा वाढ झालेली नाही. हद्दवाढीबाबत वारंवार प्रस्ताव सादर केला जातो, त्यावर आंदोलन केले जाते; मात्र निर्णय होत नाही. तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महापालिकेने गेल्या वर्षी (23 जानेवारी 2021) पुन्हा हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. यामध्ये शहरालगतच्या दोन औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) आणि 18 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

हद्दवाढीबाबत जनआंदोलन सुरू आहे; मात्र प्रशासकीय पातळीवर त्याबाबत फारशी हालचाल सुरू नसल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवरच हद्दवाढीबाबत चर्चा होताना दिसत आहे. हद्दवाढीत प्रस्तावित केलेल्या गावात मात्र ग्रामपंचायत निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. प्रशासनाकडूनही निवडणुकांची प्रशासकीय तयारी सुरू असल्याने येत्या महिना-दोन महिन्यांत या गावांच्या निवडणुका होतील अशीही शक्यता आहे. यामुळे हद्दवाढीची मागणी पुन्हा मागे पडेल याची भीती आहे.

कोल्हापूर शहरालगतच्या 18 गावांचा प्रस्तावित हद्दवाढीत समावेश करण्यात आला आहे. यापैकी बहुतांश सर्वच गावांत निवडणुका होणार असून गुरुवारपासून मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे. दि. 21 आक्टोबर रोजी मतदार यादी अंतिम होणार आहे. यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार गुुरुवार, दि. 13 ते दि. 21 आक्टोबरपर्यंत मतदार याद्या अंतिम केल्या जाणार आहेत. दरम्यान, मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचीही प्रक्रिया सुरू केली; मात्र प्रशासक नियुक्तीपूर्वीच या निवडणुका होतील, अशीही शक्यता आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.

Back to top button