कोल्हापूर : लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा | पुढारी

कोल्हापूर : लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या गुरुवार, दि. 13 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. दि. 21 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. यामुळे लवकरच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या राज्यातील 7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

गुरुवार, दि. 13 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. दि. 13 ते दि. 18 या कालावधीत प्रारूप मतदार यादीवर हरकत घेता अथवा सूचना करता येणार आहे. दाखल हरकती अथवा सूचनांवर निर्णय घेऊन दि. 21 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर कोणत्याही क्षणी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार
आहे.

जिल्ह्यात उडणार राजकीय धुरळा

जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या तब्बल 475 इतकी आहे. यामुळे जवळपास जिल्ह्याच्या एक तृतीयांश भागात निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. कोल्हापूर शहराला जोडून असलेल्या प्रमुख गावांसह जिल्ह्यातील अन्य प्रमुख गावांचाही यामध्ये समावेश आहे. राजकीय अस्तित्वासाठी या निवडणुका चुरशीने होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात लवकरच राजकीय धुरळा उडणार आहे.

Back to top button