आरोपीचे ‘श्रीदेवी’ नावाने फेसबुक पेज : केरळ ‘नरबळी’प्रकरणी धक्‍कादायक खुलासे | पुढारी

आरोपीचे 'श्रीदेवी' नावाने फेसबुक पेज : केरळ 'नरबळी'प्रकरणी धक्‍कादायक खुलासे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झटपट श्रीमंत होण्‍यासाठी एका दाम्‍पत्‍याने सराईत गुन्‍हेगाराच्‍या मदतीने दोन महिलांचा नरबळी दिल्‍याची धक्‍कादायक घटना केरळमधील एलांथूर घडल्‍याचे मंगळवारी उघडकीस आले. ‘श्रीदेवी’ नावाने फेसबुक पेज असणार्‍या सराईत गुन्‍हेगाराशी दाम्‍पत्‍याने संपर्क साधला. त्‍यानेच दाम्‍पत्‍याला नरबळी देण्‍यासाठी तयार केले. यानंतर रस्‍त्‍यावर लॉटरी तिकिट विकणार्‍या महिलांना पैशाचे आमिष दाखवून आपल्‍यासोबत नेले होते. यानंतर या तिघांनी मिळून या दोन महिलांचा अत्‍यंत थंड डोक्‍याने खून केला, अशी धक्‍कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अंधश्रद्‍धेतून घडलेल्‍या या विकृत प्रकाराने केरळ हादरले आहे. दाम्‍पत्‍यासह सराईत गुन्‍हेगाराला न्‍यायालयाने १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावली आहे.

‘श्रीदेवी’ फेसबुक पेजच्‍या माध्‍यामातून दाम्‍पत्‍य सराईत गुन्‍हेगाराच्‍या संपर्कात

झटपट श्रीमंत होण्‍याच्‍या आमिषातून महिलांचा बळी घेणारे भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला.

याप्रकरणी पोलीस आयुक्‍त सीएच नागाराजू यांनी सांगितले की, एलांथूर येथील देशी औषध विक्री करणार्‍या भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला यांची झटपट श्रीमंत होण्‍याची धडपड सुरु होती. लैलाने एर्नाकुलम जिल्‍ह्यातील पेरुंबवूर येथील रहिवासी आणि सराईत गुन्‍हेगार मोहम्मद शफी उर्फ ​​रशीद याच्‍याशी फेसबूकच्‍या माध्‍यमातून संपर्क साधला. श्रीदेवी नावाने त्‍याचे फेसबूक पेज होते. त्‍यानेच या दाम्‍पत्‍याला झटपट श्रीमंत होण्‍यासाठी महिलांचा बळी द्‍यावा लागेल, असे सांगितले तसेच नरबळीसाठी दोन महिला मिळवून देतो, असे सांत भागवल सिंगकडून नरबळी विधींसाठी पैसेही घेतले. .

रस्‍त्‍यावर लॉटरी तिकिट विकणार्‍या महिलांना आमिष

एलमकुलम, कोचीवास येथील रस्‍त्‍यावर लॉटरी तिकिटाची विक्री करणार्‍या दोन महिला सप्‍टेंबरपासूनच बेपत्ता होत्‍या. त्‍यांच्‍या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्‍याची फिर्यादही दिली होती. शफी याने या दोन महिलांना अधिक पैसे मिळतील, असे आमिष दाखवून कोचीहून आपल्‍याबरोबर त्रिरुवल्ला येथे नेले होते.

महिलांच्‍या मोबाईल फोनमुळे नरबळीचे गूढ उकलले

कोचीचे पोलीस आयुक्‍त सीएच नागाराजू यांनी सांगितले की, “ज्‍या महिलांचा खून झाला त्‍या सप्‍टेंबरपासूनच बेपत्ता होत्‍या. त्‍यांच्‍या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्‍याची फिर्यादही पोलीस स्‍टेशनला दिली होती. पोलीसांनी या महिलांच्‍या मोबाईल फोनचे लोकशन तपासले. पोलीस त्रिरुवल्ला येथे पोहचले. येथील सीसीटीव्‍ही फुटेजची तपासणी केली. यामध्‍ये भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला व नरबळी देण्‍यात आलेल्‍या महिला दिसल्‍या. पोलिसांनी दाम्‍पत्‍याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तिघांनीही पैशाच्‍या हव्‍यासापोटी दोन महिलांचा खून केल्‍याची कबुली दिली आहे.”

पोलिसांचे पथक घराच्या आवारातून मृतदेह बाहेर काढते

तिन्ही आरोपी हत्येत थेट सहभागी होते. दोन महिलांचा खून करुन मृतदेहाचे तुकडे करण्‍यात आले. यानंतर दाम्‍पत्‍याच्‍या घराच्या आवारातच ते पुरण्‍यात आले होते. शफी हा या पूर्वी ट्रक चालक होता. याच्‍यावर एका ७५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे.

अंधश्रद्‍धेतून निर्माण झालेली विकृती सभ्‍य समाजासाठी धोकादायक : मुख्‍यमंत्री विजयन

नरबळीतून दोन महिलांच्‍या हत्‍या करण्‍यात आल्‍याच्‍या घटनेवर केरळचे मुख्‍यमंत्री पिनाराई विजयन यांनी तीव्र दु:ख व्‍यक्‍त केले आहे. अंधश्रद्‍धेतून निर्माण झालेली विकृती सभ्‍य समाजासाठी धोकादायक आहे, असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

 

Back to top button