

जुन्नर; पुढारी वृतसेवा : चिखली (पुणे) येथून पळविलेल्या चार वर्षे वयाच्या मुलीची जुन्नर पोलिसांनी सुटका केली. ही घटना रविवारी (दि. २४) पहाटे घडली. याप्रकरणी विमल संतोष चौगुले (वय २८) व संतोष मनोहर चौगुले (वय ४१, दोघेही रा. महादेवनगर, जुन्नर) या दाम्पत्याला जुन्नर पोलिसांनी अटक करून पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या बाबतची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे व पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चिखली येथून एक चार वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती जुन्नर पोलिसांना शनिवारी (दि. २३) रात्री उशिराने मिळाली. संशयितांचे मोबाईल लोकेशन जुन्नर हद्दीत असल्याचे समजले. त्यानुसार यावेळी गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार भरत मुठे व संतोष पठारे यांनी येथील महादेवनगर वस्तीतील एका घराची पाहणी केली. तेथे चौगुले दांपत्य व ही लहान मुलगी आढळून आली.
दरम्यान या घटनेतील आरोपी विमल ही चिखलीला बहिणीकडे गेली असता शेजारील चिमुकलीला नरबळीसाठी पळवून आणल्याचे संतोषने कबूल केले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक दिलीप पवार व सहकाऱ्यांनी पार पाडली.
हेही वाचा ;