हमी भाव : गव्हाच्या किमान हमी भावात ४० रुपयांनी वाढ | पुढारी

हमी भाव : गव्हाच्या किमान हमी भावात ४० रुपयांनी वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आगामी रबी हंगामातील विविध पिकांसाठीचे किमान हमी भाव (एमएसपी) केंद्र सरकारने जाहीर केले असून गव्हाचा किमान हमी भाव प्रतिक्विंटलमागे 40 रुपयांनी वाढविण्यात आला आहे.

सध्या असलेल्या 1975 रुपये हमीभावाच्या तुलनेत गव्हासाठी 2015 रुपये इतका एमएसपी जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीच्या बैठकीत एमएसपी दरांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सरकारने मोहरी, हरभरा, मसूर यांच्या एमएसपीमध्येही भरीव वाढ केली आहे. एक क्विंटल गहू पिकविण्यासाठी सुमारे 1 हजार 8 रुपये खर्च येतो. त्या तुलनेत दुप्पट म्हणजे 2015 रुपये हमीभाव दिला जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

मोहरीच्या हमीभावात सर्वाधिक म्हणजे 400 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

याआधी असलेला मोहरीचा हमीभाव 4650 रुपये प्रतिक्विंटलच्या तुलनेत 5 हजार 50 रुपयांवर नेण्यात आला आहे. मोहरीचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्च 2523 रुपये इतका गृहित धरण्यात आलेला आहे.

खाद्यतेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गेल्या काही काळात मोहरीचे भाव कडाडले आहेत. वाढीव एमएसपीमुळे मोहरी लागवड क्षेत्रात वाढ होईल, असा कृषी मंत्रालयाचा होरा आहे. गहू आणि मोहरी ही रब्बी हंगामातली प्रमुख पिके मानली जातात.

मसूरच्या हमीभावात 7.8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या असलेला मसूरचा हमीभाव 5100 रुपयांवरुन 5500 रुपयांवर नेण्यात आला आहे. दुसरीकडे हरभर्‍याचा 5100 रुपयांवर असलेला हमीभाव 5230 रुपयांवर नेण्यात आला आहे.

बार्लीच्या हमीभावात 30 रुपयांची वाढ करण्यात आली असून हा हमीभाव आता 1600 रुपयांवरुन 1635 रुपयांवर गेला आहे. करडईच्या हमीभावात 5327 रुपयांवरुन 5441 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 114 रुपयांची आहे.

Back to top button