Mahakal Corridor : ८५६ कोटी रुपये खर्चून बांधलेला ‘महाकाल कॉरिडॉर’ आहे तरी कसा? ; पंतप्रधानांच्या हस्ते उद्या हाेणार लोकार्पण

महाकाल कॉरिडॉर
महाकाल कॉरिडॉर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात नव्याने उभारलेल्या महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास प्रकल्पाच्या (Mahakal Corridor) पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ११) करण्यात येणार आहे. ८५६ कोटी रुपये खर्चून उज्जैनमध्ये बांधलेला ९०० मीटरपेक्षा जास्त लांबीचा 'महाकाल लोक' हा भारतातील आतापर्यंत बांधलेल्या सर्वात मोठ्या कॉरिडॉरपैकी एक आहे. हा कॉरिडॉर जुन्या रुद्रसागर तलावाजवळ आहे.

दोन भव्य प्रवेशद्वार, वाळूच्या खडकांपासून तयार केलेले १०८ सुशोभित खांब, खांबावर कोरलेली गुंतागुतींची नक्षी, कारंजे आणि शिवपुराणातील कथा दर्शविणारी ५० हून अधिक भित्तिचित्रांमुळे 'महाकाल लोक' चे सौंदर्य अधिक खुलले आहे. प्राचीन महाकालेश्वर मंदिराभोवती पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत हा कॉरिडॉर (Mahakal Corridor) पुनरुज्जीवित करण्यात आला आहे.

(Mahakal Corridor) महाकालेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक
महाकालेश्वर मंदिर हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी देशाच्या विविध भागातून लाखो भाविक पूजाअर्चा आणि दर्शनासाठी येत असतात. नंदी दरवाजा आणि पिनाकी दरवाजा अशी दोन भव्य प्रवेशद्वार बांधण्यात आली आहेत.

राजस्थान, गुजरात आणि ओडिशा येथील कारागिरांनी कोरले दगड
या प्रकल्पाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाकाल लोकच्या बांधकामासाठी राजस्थानमधील बन्सी पहारपूर भागातील वाळूच्या खडकांचा वापर करण्यात आला आहे. राजस्थान, गुजरात आणि ओडिशा येथील कारागिरांनी दगडांचे कोरीव काम केले आहे.

अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध
मध्य प्रदेश सरकारने २०१७ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामास सुरूवात केली. प्राचीन मंदिर वास्तुकलेचा वापर करून ऐतिहासिक शहर उज्जैनचे प्राचीन वैभव पुनर्स्थापित करणे या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. सर्व अत्याधुनिक सुविधा या कॉरिडॉरमध्ये पुरविण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पब्लिक अॅड्रेस सिस्टम बसविण्यात आले आहे.

(Mahakal Corridor) कॉरिडॉरमध्ये रुद्राक्ष-कदम रोपे लावण्यात आली आहेत
कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलममध्ये उल्लेख केलेल्या बागायती प्रजातींची रोपे कॉरिडॉरमध्ये लावण्यात आली आहेत. धार्मिक महत्त्वाची असलेली ४० ते ४५ प्रजातींची रोपे लावली आहेत. ज्या मध्ये रुद्राक्ष, बकुल, कदम, बेलपत्र, सप्तपर्णी यांचा समावेश आहे.

उज्जैन स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार पाठक म्हणाले की, जुन्या क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे एक प्राचीन आणि पवित्र शहर आहे. ज्याला पूर्वी उज्जयिनी आणि अवंतिका म्हणूनही ओळखले जात होते. हे शहर राजा विक्रमादित्यच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. जुने हिंदू ग्रंथ महाकालेश्वर मंदिराभोवती महाकाल जंगलाचे वर्णन करतात. या महाकाल लोक प्रकल्पामुळे शतकानुशतके पूर्वीच्या पुरातन वास्तूचे पुनरुज्जीवन होऊ शकत नाही. परंतु, कॉरिडॉरमधील खांब आणि इतर संरचनांच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या जुन्या, सौंदर्यपूर्ण वास्तुकलेच्या माध्यमातून आम्ही ते वैभव परत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news