नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाचे संरक्षण मंत्रीपद तसेच उत्तर प्रदेशचे तीनवेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सोमवारी (दि. १०) सकाळी सव्वा आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उच्च रक्तदाब, लघवी मार्गातील संक्रमण तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर यादव यांना गेल्या 2 तारखेला मेदांतामध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. ११) उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी सैफई येथे दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यादव यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेश सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोकवटा जाहीर केला आहे.
मुलायमसिंह यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला. त्यांचे वडील सुघरसिंह यादव शेतकरी होते. मुलायमसिंह सध्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात जसा त्यांचा दबदबा होता, तसे देशाच्या राजकारणातही त्यांचे नाव अदबीने घेतले जात असे. मुलायमसिंह हे तब्बल आठवेळा आमदार तर सातवेळा खासदार होते.
मुलायमसिंह यांची दोन लग्ने झाली होती. पहिल्या पत्नी मालतीदेवी यांचा मे 2003 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांनी साधना गुप्ता यांच्याशी विवाह केला होता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे मुलायम – मालतीदेवी यांचे पुत्र होत. तर प्रतिक यादव हे दुसऱ्या पत्नीपासून झालेले पुत्र होत. साधना गुप्ता यांचा तीन महिन्यांपूर्वी मेदांता रुग्णालयातच मृत्यू झाला होता. साधना यांच्या निधनानंतर मुलायम खचले होते.
मुलायमसिंह हे 1967 साली सर्वप्रथम आमदार बनले. 1977 मध्ये ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये सहकार मंत्री झाले. त्यावेळी ते लोकदल पक्षाचे अध्यक्ष होते. 1980 साली जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी भूषविले. 1982 ते 1985 या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. 1985 ते 1987 दरम्यान ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. तर 1989 साली मुलायमसिंग पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. 1992 साली त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1993 ते 1995 या काळात ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. 1996 साली ते पहिल्यांदा खासदार झाले. 1996 ते 1998 दरम्यान यादव हे देशाचे संरक्षण मंत्री होते. 2003 ते 2007 या कालावधीत त्यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले. 2007 ते 2009 दरम्यान ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. यानंतर 2009, 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून यादव लोकसभेत गेले होते.
मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बसपा नेत्या मायावती, राजद नेते लालूप्रसाद यादव, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनी शोक व्यक्त केला आहे. यादव यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुलायम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अखिलेश हे भावूक झाले. 'माझे वडील आणि सर्वांचे नेताजी आता राहिले नाहीत' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. मुलायम यांच्या निधनाने वृत्त आल्यानंतर अखिलेश, त्यांचे काका शिवपाल यांच्यासह यादव कुटुंबियांनी तात्काळ मेदांता रुग्णालयात धाव घेतली. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा हेही दिल्लीहून गुरुग्रामला रवाना झाले.
'मुलायमसिंह यांच्या निधनामुळे समाजवादी विचारधारेचे तसेच राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. सदनात त्यांच्यासोबत काम करता आले, हे आपले सौभाग्य आहे' अशा शब्दांत राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी शोकसंदेशात म्हणतात की, 'मुलायमसिंग हे विलक्षण व्यक्तिमत्वाचे धनी होते. एक विनम्र आणि जमिनीशी नाळ जुळलेला नेता, अशी त्यांची ओळख होती. लोकांच्या समस्यांप्रती ते संवेदनशील होते. लोकनायक जयप्रकाश नारायण तसेच डॉ. राम मनोहर लोहिया यांचा आदर्शवाद लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणात मुलायमसिंग यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी ते एखाद्या सैनिकाप्रमाणे लढले'.
हेही वाचलंच का ?