पहिल्या सहामाहीमध्ये प्रत्यक्ष करवसुलीत 23.8 टक्क्यांची वाढ | पुढारी

पहिल्या सहामाहीमध्ये प्रत्यक्ष करवसुलीत 23.8 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये प्रत्यक्ष करवसुलीत 23.8 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली. प्रत्यक्ष कर वसुलीमध्ये कंपनी कर तसेच वैयक्तिक कराचा समावेश असतो. सहामाहीत कंपनी करांमध्ये 16.74 टक्क्याने तर वैयक्तिक कर वसुलीत 32.30 टक्क्याने वाढ नोंदविली गेली आहे.

1 एप्रिल ते 8 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 8.98 लाख कोटी रुपयांची प्रत्यक्ष करवसुली झाली आहे. रिफंड वगळल्यानंतर सरकारला 7.45 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एकूण अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या तुलनेत हा आकडा 52.46 टक्के इतका आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष करवसुलीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. पहिल्या सहामाहीत सरकारकडून 1.53 लाख कोटी रुपयांचा परतावा अर्थात रिफंड देण्यात आला असून, रिफंडमध्ये झालेली वाढ 16.3 टक्क्यांनी जास्त आहे.

औद्योगिक उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात काही प्रमाणावर मंदीचे वातावरण असले तरी करवसुलीत समाधानकारक वाढ झाली आहे. गतवर्षी निर्यातीत भरघोस वाढ झाली होती, मात्र यंदा या क्षेत्राने निराशा केली आहे. जीएसटी कराच्या वसुलीत मागील काही काळात चांगली वाढ झाली आहे. मासिक जीएसटी वसुलीचा आकडा सातत्याने 1.40 लाख कोटी रुपयांच्या पुढे राहिलेला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button