Salman Khan : अल्पवयीन मुलाकडे होती सलमान खानला ठार मारण्याची जबाबदारी | पुढारी

Salman Khan : अल्पवयीन मुलाकडे होती सलमान खानला ठार मारण्याची जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली पोलिसांनी दहशत पसरवल्याप्रकरणी २ जणांना अटक केली आहे. यातील एक अल्पवयीन असून मोहालीच्या पंजाब मुख्यालयात ९ मे रोजी झालेल्या RPG आरपीजी हल्ल्यात या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्याला  गुजरातच्या जामनगर येथून अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांनी बॉलीवूड अभिनेते सलमान खानला (Salman Khan) मारण्याचे काम या मुलाकडे सोपविण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या चौकशीत अटक केलेल्या अल्पवयीन मुलाने सांगितले की, लॉरेन्स बिश्नोईने मला सलमान खानला मारण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र, मी सलमानऐवजी गँगस्टर राणा कांदोवालियाला मुख्य लक्ष्य बनवले. दरम्यान, २९ मे रोजी प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. ज्याची जबाबदारी लॉरेन्स विश्नोई टोळीने घेतली होती. त्यानंतर आरोपींनी सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केल्यापासून सलमानचे चाहते त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. आता अल्पवयीन मुलाची चौकशी सुरू असली, तरी अटक केलेल्या आरोपींच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू आहे.

सलमानला (Salman Khan) मारण्यासाठी लॉरेन्सने ४ वेळा योजना आखली होती

सलमानला मारण्यासाठी लॉरेन्सने ४ वेळा योजना आखली होती. यासाठी त्याने एक रायफलही खरेदी केली होती. लॉरेन्सने २०१८ मध्ये सलमानला मारण्यासाठी नेमबाज संपत नेहराला मुंबईत पाठवले होते. संपतकडे पिस्तूल होते. मात्र, सलमान पिस्तुलाच्या रेंजपासून खूप दूर होता. त्यामुळे तो त्यांना मारू शकला नाही. यानंतर त्याने लांब पल्ल्याची रायफल खरेदी केली. त्यानंतर संपत सलमानला मारण्यासाठी आला. पण मारण्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले. यानंतर लॉरेन्सने त्याला आणखी २ वेळा मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला सलमानला मारण्याची संधी मिळाली नाही.

हेही वाचलंत का ? 

Back to top button