RBI Digital Rupee : डिजिटल रुपाया – जाणून घ्या ७ महत्त्वाचे मुद्दे | पुढारी

RBI Digital Rupee : डिजिटल रुपाया - जाणून घ्या ७ महत्त्वाचे मुद्दे

RBIचा डिजिटल रुपाया - जाणून घ्या ७ महत्त्वाचे मुद्दे

पुढारी ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिजिटल रुपायाची संकल्पना मांडलेली आहे. ७ ऑक्टोबरला या संदर्भातील संकल्पना मांडणारा अहवाल RBIने जाहीर केली आहे. यानुसार RBIने प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपाया बाजारात आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. हा डिजिटल रुपाया नेमका कसा असेल याबद्दल सध्या उत्सुकता आहे. हा रुपाया नेमका कसा असेल हा जाणून घेण्याचा हा प्रयत्न. (RBI Digital Rupee)

डिजिटल रुपाया (ई-रुपी) कसा असेल?

ई रुपी किंवा डिजिटल रुपाया हा भारतीय रुपायाचा डिजिटल अवतार असेल. होलसेल आणि रिटेल अशा दोन प्रकारात हा रुपाया लाँच होईल. होलसेल डिजिटल रुपाया हा बँकांमधील व्यवहारांसाठी असेल तर रिटेल रुपाया हा सर्वसामान्य ग्राहकांसाठी असेल. हा डिजिटल रुपाया बँकेच्या वॉलेटलमध्ये ठेवता येईल.

डिजिटल रुपाया क्रिप्टोकरन्सी आहे का?

डिजिटल रुपाया बनवण्यासाठी क्रिप्टोकरन्सीच्या तंत्रज्ञानाचा काही भाग वापरला जाईल. पण यावर अजून निर्णय झालेला नाही. तसेच क्रिप्टोकरन्सी ही खासगी स्वरुपाची असते तर डिजिटल रुपाया हा रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध केला जाईल, तसेच नियंत्रित केला जाईल.

डिजिटल रुपाया तुम्ही बनवू शकता का?

नाही. बिटकॉईनसारखा डिजिटल रुपाया Mine करता येणार नाही. तो फक्त RBI जारी करेल.

वितरण कोणाकडून होईल?

RBIने जो प्रस्ताव दिला आहे, त्यानुसार व्यापारी बँका याचे वितरण करतील.

डिजिटल रुपायावर व्याज मिळणार का?

डिजिटल रुपायावर व्याज मिळणार नाही. जर व्याज देऊ केले तर लोक बँकांतून पैसे काढून ते डिजिटल रुपायात बदलतील त्यामुळे बँका अडचणीत येतील.

निनावी व्यवहार करता येतील का?

बँकेच्या माध्यमातून जे व्यवहार होतात ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होतात. पण रोख व्यवहार मात्र निनावी असतात. डिजिटल रुपयांचे लहान व्यवहार हे निनावी होऊ शकतील. पण मोठे व्यवहार निनावी प्रकारे होऊ शकणार नाहीत.

डिजिटल रुपयाचा फायदा काय?

हे व्यवहार अगदी सोप्या पद्धतीने होतील. तसेच रोख व्यवहारावरील खर्चही कमी होऊ शकेल. हे व्यवहार इंटरनेटशिवाय होतील का यासाठी RBI विचार करत आहे. पण ऑफलाईन पद्धतीने असे व्यवहार करताना एकच डिजिटल रुपाया अनेकांना जाऊ शकतो, हा धोका टाळण्यासाठी RBI ऑफलाईन व्यवहारांवर मर्यादा ठेवण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा

Back to top button