शाळा सुरू करा! सर्वेक्षणातून ग्रामीण भागातील ९७ टक्के पालकांनी नोंदवले मत | पुढारी

शाळा सुरू करा! सर्वेक्षणातून ग्रामीण भागातील ९७ टक्के पालकांनी नोंदवले मत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महारोगराईच्या प्रकोपामुळे देशभरातील शाळा अद्याप बंदच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मुलांना ऑनलाईन शिकवणी दिली जात आहे. तर, इयत्ता १० आणि १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी काही ठिकाणी शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, असे असले तरी, ग्रामीण भागातील ९७ टक्के आणि शहरी भागातील ९० टक्के पालकांनी लवकरात लवकर शाळा सुरू करावी, असे मत एका सर्वेक्षणातून व्यक्त केले आहे.

देशातील १५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. अर्थशास्त्रज्ञ ज्यां द्रेज, रीतिका खेरा आणि संशोधक विपुल पॅकेरा सह जवळपास १०० जणांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात १४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कोरोना महारोगराईमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात राहणार्या गरीब मुलांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

ग्रामीण भागातील केवळ ८ टक्के मुले ऑनलाईन शिक्षण घेवू शकत आहे. तर, शहरातील केवळ २४ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

शहरात राहणाऱ्या ४२ टक्के मुलांना काही शब्दांहून अधिकचे शब्द वाचता येत नाही.तर, ग्रामीण भागातील स्थिती याहून खराब आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ४८ टक्के आहे.

शहरातील १९ टक्के मुले शिक्षण घेत नाहीत,तर ग्रामीण भागात हे प्रमाण ३७ टक्के असल्याचा दावा सर्वेक्षणातून करण्यात आला.

चिल्ड्रेन ऑनलाईन अँड ऑफलाईन (लर्निंग) स्कूल सर्वेक्षणानूसार ऑगस्ट २०२१ मध्ये आसाम, बिहार, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश तसेच पश्चिम बंगालमध्ये ही पाहणी करण्यात आले. सर्वेक्षणात गरीब तसेच वंचित भागांतील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

सर्वेक्षणात भाग घेणारे जवळपास ६० टक्के कुटुंब ग्रामीण भागातील आहे. यातील ६० टक्के कुटुंब दलित तसचे आदिवासी पाश्र्वभूमिचे आहेत. सर्वेक्षणाचा पहिला टप्प्यात १ हजार ३६२ घरातील इयत्ता पहिले ती आठवी पर्यंत शिकणार्या १ हजार ३६२ मुलांवर करण्यात आला.

ग्रामीण भागातील केवळ २८ टक्के सर्वेक्षणाच्या काळात नियमित स्वरूपात अभ्यास करतांना दिसून आले. तर, अभ्यास न करण्याचे प्रमाण ३७ टक्के होते.

मुलांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीतून मुबलक शिक्षण मिळत असल्याचे मत शहरातील २३ टक्के पालकांनी नोंदवले. लॉकडाउन दरम्यान मुलांमधील शिक्षणाची क्षमता कमी झाले असल्याचे मत ग्रामीण भागातील ७५ टक्के पालकांनी नोंदवले.

आसाम, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश मध्ये शाळांच्या बंद दरम्यान ज्यांना ऑनलाइन वर्गात प्रवेश नाही त्यांना इतर कोणत्याही प्रकारे अभ्यास करता येईल. याची खात्री करण्यासाठी अक्षरशः काहीही करण्यात आले नाही, असे अहवालात म्हटले आहे.

दुसरीकडे कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानने शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी भेटीसाठी जाण्यास सांगितले आणि गृहपाठ म्हणून ऑफलाईन असाइनमेंट देण्यास सांगितले. परंतु, असे असूनही, यातील बहुतेक प्रयत्नांचे परिणाम समाधानकारक नाहीत.

Back to top button