Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सुनावणी घरबसल्या पाहता येणार | पुढारी

Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सुनावणी घरबसल्या पाहता येणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पक्ष आणि चिन्हाच्या मुद्यावर निवडणूक आयोगाने सुनावणी घ्यावी किंवा नाही, यावर घटनापीठ सर्वप्रथम निर्णय देणार असल्याचे समजते. शिवसेनेवर नेमका हक्क कोणत्या गटाचा, यावरुन राज्यात संघर्ष सुरु आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे आवश्यक ते पुरावे सादर केले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवल्यानंतर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग केले होते. त्यावर सुनावणीला सुरुवात होत आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटिसांना आव्हान दिले असून शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्द्यांवर शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले आहे. दोन्ही गटाच्या विविध याचिकांवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे सुनावणी होईल. मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे, अशी शिंदे गटाची मागणी आहे. (Maharashtra Political Crisis)

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court ) होणार्‍या महत्वपूर्ण खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण (live streamed) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आज मंगळवारपासून नागरिकांना न्यायालयाचे कामकाज घरबसल्या पाहता येणार आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी गेल्या आठवड्यात सरन्यायाधीश उदय लळीत यांना पत्र लिहित न्यायालयातील महत्वाच्या खटल्यांचे कामकाज थेट प्रक्षेपित केले जावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार युट्यूबवरुन कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या खटल्याची सुनावणी घरबसल्या पाहता येणार आहे.

 हे ही वाचा :

Back to top button