नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव घेणार सोनिया गांधींची भेट | पुढारी

नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव घेणार सोनिया गांधींची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : अगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्ली येथे भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादवही असणार आहेत. काँग्रेस, जेडीयू आणि आरजेडी या तीन पक्षांची पाच वर्षानंतरची पहिलीच भेट आहे.

इंडियन नॅशनल लोक दलाचे (इनेलो) संस्थापक चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त ओमप्रकाश चौटाला यांनी हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यात रॅली आयोजीत केली आहे. या रॅलीमध्ये लालू यादव आणि नितीश कुमार सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी मंगळवारी लालू यादव यांनी नितीश कुमार यांच्यासह सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे सांगितले होते.

बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत हातमिळवणी केल्यानंतर नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. गेल्या दिल्ली दौऱ्यात नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. आज सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपविरोधी विरोधकांची एकजूट करण्याचा नितीश कुमार यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात पटना येथे नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून दाखवणारे अनेक पोस्टर्स दिसून आले होते. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी अशा भेटींना विरोधी ऐक्य म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांची मते मिळविण्यासाठी “विश्वासार्ह चेहरा” आणि जनआंदोलनाची गरज असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button