म्यानमारमध्ये नोकरीसाठी पाठविलेल्या दीड हजार भारतीयांना डांबले! | पुढारी

म्यानमारमध्ये नोकरीसाठी पाठविलेल्या दीड हजार भारतीयांना डांबले!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विदेशात नोकरीसाठी पाठविलेल्या तरुणांना थायलंड येथे डांबून ठेवून त्यांच्या सुटकेसाठी पैशांची मागणी करणार्‍या टोळीविषयी अनेक धक्कादायक खुलासे करण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. विदेशात नोकरीसाठी पाठविणारी ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असून या टोळीतील आठ वॉण्टेड आरोपींची नावे तपासामध्ये पोलिसांना समजली आहेत.

या टोळीने आतापर्यंत म्यारमारमध्ये एक ते दिड हजार भारतीयांना डांबून ठेवले आहे. त्यांच्या सुटकेसाठी दूतावास कार्यालयातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या गुन्ह्यांची व्याप्ती पाहता त्याचा तपास वांद्रे पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटकडे सोपविण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तपास गुन्हे शाखेकडे असल्याने याबाबत अधिक माहिती सांगण्यास नकार दिला. वांद्रे येथून पाच तरुणांना काही महिंन्यांपूर्वी थायलंड येथे नोकरीसाठी पाठविण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर या तरुणांना एका बंकरमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर म्यानमार येथे आणून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसाचे कागदपत्रे घेतल्यानंतर त्यांच्याकडे सहा हजार डॉलरची मागणी करण्यात आली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना तिथेच डांबून ठेवण्यात येईल. त्यांना पुन्हा भारतात पाठविण्यात येणार नाही अशी धमकीच देण्यात आली होती. विशेष म्हणजे ते पळून जाऊ नये म्हणून तिथे काही बंदूकधारी सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहे. त्यापैकी एका तरुणाने त्याच्या वांद्रे येथील मित्राला ही माहिती दिली होती. या मित्राने वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तरुणांना इम्युअरल ग्रीन या विदेशी नागरिकाने पाठविले होते. त्यामुळे त्याच्यासह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी 342, 406, 346, 347, 364, 370, 374, 406, 420, 506, 120 ब आणि पासपोर्ट कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या पथकाने इम्युअरल ग्रीने या नायजेरीयन नागरिकाला 9 सप्टेंबरला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. ग्रीनेने आतापर्यंत आठ विदेशी आरोपींची माहिती पोलिसांना दिली आहे. ते सर्वजण सध्या विदेशात वास्तव्यास आहेत. या टोळीने गेल्या तीन ते चार वर्षांत मुंबईसह देशभरातून एक ते दिड हजार तरुणांना विदेशात नोकरीसाठी पाठविले आहे. विदेशात गेल्यानंतर त्यांना म्यानमारला नेऊन तिथे डांबून ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना कुठल्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. काहींना कंपन्यांच्या नावाने तर काहींना थेट थायलंड आणि नंतर म्यारमार येथे पाठविण्यात आले. त्यात वांद्रे येथील पाच तरुणांचा समावेश आहे. एक ते दीड हजार भारतीयांना डांबून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

Back to top button