तुकडा तांदळाच्या निर्यातीवर प्रतिबंध!, मागील चार वर्षात निर्यातीत ४३ पटींनी वाढ | पुढारी

तुकडा तांदळाच्या निर्यातीवर प्रतिबंध!, मागील चार वर्षात निर्यातीत ४३ पटींनी वाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- देशात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुकडा तांदळाच्या निर्यात धोरणात ‘मुक्त’ वरुन ‘प्रतिबंधित’ अशी दुरूस्ती करीत केंद्राने देशांतर्गत अन्नसुरक्षा सुनिश्चित केल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार व अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

देशातील कुक्कुटपालन उद्योग तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरण्यासाठी, इथेनॉल मिश्रण (ईबीपी) कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी तुकडा तांदळाची पुरेशी उपलब्धतेसाठी निर्यात धोरणात दुरुस्ती करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून कळवण्यात आले आहे.

पशुखाद्याच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका

आंतराराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने देशांतर्गत तुकडा तांदळाचे दर १६ वरून २२ रुपये किलोवर पोहोचले होते. पशुखाद्याच्या दरवाढीमुळे कुक्कुटपालन, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या खाद्यासाठी ६० ते ६५% खर्च तुकडा तांदळासाठी केला जातो. या किंमती वाढल्याने दूध, अंडी, मांस सारख्या पोल्ट्री उत्पादनांच्या किंमतीवर त्याचा प्रभाव पडल्याने अन्नधान्य महागण्याची भीती असते.

गेल्या ४ वर्षात तुकडा तांदळाच्या निर्यातीत ४३ पटीने वाढ झाली. २०१९ मध्ये निर्याती वाट्यात १.३४% असलेला तुकडा तांदूळ २२.७८ टक्क्यावर पोहचला. २०१८ ते २२ दरम्यान तुकडा तांदळाची एकूण निर्यात ३१९ टक्क्यांनी वाढली.सार्वजनिक वितरण व्यवस्थेची मागणी पूर्ण करण्यासाठी देशाने पुरेसा अतिरिक्त साठा राखून ठेवला आहे. यामुळे देशांतर्गत किंमती नियंत्रणात राहतील, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button