सत्येंद्र जैन खटला हस्तांतरणावरील आदेश सुरक्षित | पुढारी

सत्येंद्र जैन खटला हस्तांतरणावरील आदेश सुरक्षित

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या न्यायालयात हस्तांतरित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवरील आदेश राऊज एवेन्यू न्यायालयाच्या मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी गुरुवारी राखून ठेवला. ‘ईडी’ने जैन यांचे प्रकरण विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्याकडे हस्तांतरित करण्याची मागणी याचिकेतून केली होती.

जैन यांच्या जामीन याचिकेवर युक्तिवादावरील काही तर्कांच्या स्पष्टोक्तीनंतर ईडीने याचिका हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.न्यायालयात सध्या ईडीच्या कोठडीत असलेले सत्येंद्र जैन तसेच इतर दोन सह आरोपी अंकुश तसेच वैभव जैन यांच्या जामिन याचिकेवर युक्तिवाद सुरू आहेत.आरोपींच्या जामिनावरील सुनावणी शेवटच्या टप्यात असतांना प्रकरण हस्तांतरणाची याचिका ईडीने दाखल केली होती, हे विशेष.

गेल्या सुनावणी सत्येंद्र जैन यांच्यावतीने युक्तिवाद करतांना वरिष्ठ वकील एन.हरिहरन यांनी विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्यावर नाराजी व्यक्त करीत ईडीकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर संताप व्यक्त केला होता. याचिकेतून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा हरिहरन यांच्या वतीने करण्यात आला होता. अशात न्यायालयाने याचिका हस्तांतरण संबंधीचा निकाल राखून ठेवल्याने जैन यांच्यासंबंधीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button