बंद खोलीत काय घडलं, अजून नाही समजलं, मंत्री देसाई यांची उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत टीका | पुढारी

बंद खोलीत काय घडलं, अजून नाही समजलं, मंत्री देसाई यांची उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत टीका

नगर : पुढारी वृत्तसेवा : सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाचे फोटो लावून मते मागितली, हे सांगतानाच युती सत्तेपर्यंत पोहचली, पण पुढे काय घडलं याचं कोडं अद्याप उलगडलं नाही. त्यांचं नेमकं बंद खोलीत काय ठरलं, हे अडिच वर्षांत समजलं नाही, अशा शब्दांत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नामोल्लेख टाळत टिकास्त्र सोडले. निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी, अमित शहा मुंबईमध्ये आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे ते म्हणाले होते. शिवसेना पक्षप्रमुखांनी त्याचवेळी थेट बोलायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नसल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.  गेल्या अडिच वर्षांत कोणत्याही पदाधिकार्‍याला तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. .

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर तोबा गर्दी आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सुने-सुने असायचे. मुख्यमंत्री कधी कार्यालयातच नव्हते. सरकार दादाच चालवत होते. राष्ट्रवादीचे माजी आमदार, जिल्हाध्यक्ष कोटींचा निधी आणून कामे करीत होते. पण, आम्हाला निधी मिळत नव्हता. याकडे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नसल्याची खंत मंत्री देसाई यांनी व्यक्त केली.  शिवसेना शिंदे गटाच्यावतीने काल (दि. 21) नगर येथे हिंदू गर्व गर्जना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री देसाई बोलत होते. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, खासदार सदाशिव लोखंडे, नगरसेवक सुभाष लोंढे, बाबुशेठ टायरवाले, बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, अंकुश चितळे, भगवान गंगावणे व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, दि. 20 ते 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये हिंदू गर्जना यात्रा सुरू केली आहे. सुरतला गेलो, तेव्हा पहिल्या पंधरा आमदारांमध्ये मी होतो. तेव्हाच आम्ही पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर मान टाकली होती. आम्हाला माहित होते, आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. गेल्या अडिच वर्षांत सामान्य शिवसैनिकांचा आवाज वरपर्यंत पोहोचत नव्हता.

अनेकांचा शिंदे गटात प्रवेश
शेवगाव, पाथर्डी, नेवासे, श्रीरामपूर, अकोले आदी तालुक्यांमधील शिवसेनेचे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
एकनाथ शिंदे आम्हाला घेऊन गेले नाही तर आम्ही 40 आमदार एकनाथ शिंदेंना घेऊन गेलो. अडीच वर्षाची खदखद होती. आजही आमच्या खांद्यावर भगवा आहे तो यापुढेही राहील खर्‍या हिंदीत्वाचे विचार पेरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
                                                                      -शंभूराजे देसाई, मंत्री

मेळाव्यासाठी मेळावा हेच दुर्दैव
आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दसरा मेळाव्यासाठी कधीच निमंत्रण द्यावे लागले नाही. कधीच गर्दी जमवावी लागली नाही. शिवसैनिक उत्स्फूर्तपणे मेळाव्यास येत असत. परंतु आता दसरा मेळाव्यासाठी सुद्धा तयारीचा मेळावा घ्यावा लागत आहे, हे दुर्दैव आहे. यावरुन ज्वलंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला नसल्याचे दिसून येते.

सेना आमदरांची विनवणी धुडकावली
‘यांना घरात घ्याल, तर हे घराबाहेर काढतील’ असे सेनेचे 56 आमदार विनवणी करून सांगत होते. पण पक्षप्रमुखांनी कोणाचेही ऐकले नाही. पक्षप्रमुख देतील, तो आदेश आम्ही वंदनीय मानला. मात्र, वाट्याला उपेक्षा आली. अडिच वर्षांत कोणतेही काम झाले नाही. शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती, हे अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, असे देसाई म्हणाले.

नगरीचे प्रश्न मार्गी लावू
नगरचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावू. नगर शहरांमध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत. खुद्द मुख्यमंत्री नगर विकासमंत्री असल्याने नगर शहराचे विकास कामे तत्काळ मार्गी लावण्यात येतील. आतापर्यंत अनेक प्रस्ताव त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत. ते ताबडतोब मार्गी लावण्यात येतील. निळवंडेचा प्रश्न मार्गी लावू. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर निळवंडे धरणाचा, कालव्याचा प्रश्न बर्‍यापैकी मार्गी लागला आहे. उर्वरित कामाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे व फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे, असेही मंत्री देसाई म्हणाले.

Back to top button