Weather Forecast | महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील २-३ दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज | पुढारी

Weather Forecast | महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील २-३ दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज

Weather Forecast : मध्य प्रदेशचा ईशान्य आणि आजूबाजूच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये पुढील २-३ दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकण, मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील घाट भागात सध्या ढगाळ हवामान आहे. दरम्यान, मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. मान्सून बिकानेर, जोधपूर येथून परतीच्या मार्गावर असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात २२ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश, ओडिशा, दिल्ली, मध्य प्रदेश, कोकण आणि गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.

सर्वसाधारपणे १७ सप्टेंबरच्या आसपास  मान्सून आपला परतीचा  प्रवास  सुरू करतो. मात्र यंदा तीन दिवस उशीरा मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. महाराष्ट्रातून १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान मान्सून परतीचा प्रवास करणार आहे.

देशात गेल्या चार महिन्यापासून जून महिना वगळता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातही मान्सून मनसोक्त बरसला. आता मात्र मान्सून परतीचा प्रवासाला लागला आहे. राजस्थानच्या दक्षिण पश्चिम तसेच कच्छ भागापासून हा प्रवास मंगळवारपासून सुरू झाला आहे. मान्सून परतीच्या प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्यामुळे महाराष्ट्रातही पुढील आठ ते दहा दिवसांत परतीचा प्रवास करण्याची दाट शक्यता आहे. (Weather Forecast)

हे ही वाचा :

Back to top button