Weather Forecast | मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु, महाराष्ट्रातील 'या' भागांत जोरदार बरसणार | पुढारी

Weather Forecast | मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु, महाराष्ट्रातील 'या' भागांत जोरदार बरसणार

नवी दिल्ली : Weather Forecast; नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने (Southwest Monsoon) आज आपला परतीचा प्रवास सुरु केला आहे. मान्सून आज (दि. २०) राजस्थानचा नैऋत्य भाग आणि कच्छच्या काही भागांतून माघारी परतला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मध्य प्रदेशातील पूर्व भागात पुढील २-३ दिवसांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सर्वसाधारणपणे मान्सून राजस्थानच्या नैऋत्य भागातून १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करतो. पण यंदा तीन दिवस अधिक सक्रिय राहून मान्सूनने माघारीचा प्रवास सुरु केला आहे. तसेच छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यात २२ ते २३ दरम्यान आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २२ दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Weather Forecast)

साडेतीन महिन्यांचा मुक्काम ठोकून सर्व देशाला भरपूर पाऊस देऊन मान्सून अखेर परतीच्या प्रवासाला निघाला आहे. त्यापाठोपाठ पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या ठिकाणांहून तो आगामी पाच दिवसांत परतीला निघेल. महाराष्ट्रातून जाण्यास आठवडा लागेल. २७ सप्टेंबरदरम्यान तो महाराष्ट्रातून पुढे सरकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा हलका ते मध्यम पावसाचा असेल.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात 16 सप्टेंबर पर्यंत 1,149 मिमी पाऊस पडला आहे. राज्याची पावसाची सरासरी 916.6 असून, सध्या सरासरीपेक्षा अधिक 25 टक्के पाऊस पडला आहे. दरम्यान, मागील वर्षी पावसाळ्याच्या हंगामात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत राज्यात 1,194.3 मिमी पाऊस पडला. अर्थात, या चार महिन्यांतील राज्याची पावसाची सरासरी 1004.2 एवढी असून, सरासरीपेक्षा सुमारे 19 टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागात झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत सप्टेंबर महिना संपण्यास सुमारे चौदा दिवस बाकी असतानाच चार महिन्यांची सरासरी पार करण्यास 87 मिमी पाऊस कमी आहे. राज्यात मान्सून वेळेवर पोहचला. त्यामुळे यंदा चांगलाच पाऊस बरसेल, असे वाटले होते. मात्र, मान्सून पोहचून देखील जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यामुळे शेतकर्‍यांसह नागरिकांची चिंता वाढली होती.

हे ही वाचा :

Back to top button