नगर: पावसामुळे वाळकीचा आठवडे बाजारची दैना! जागा अपुरी अन् अतिक्रमणामुळे रस्त्यावर भरतोय बाजार | पुढारी

नगर: पावसामुळे वाळकीचा आठवडे बाजारची दैना! जागा अपुरी अन् अतिक्रमणामुळे रस्त्यावर भरतोय बाजार

वाळकी, पुढारी वृत्तसेवा: पहाटेपासून सुरू झालेला पावसाची रिपरिप दिवसभर पडतच राहिली. यामुळे वाळकी (ता. नगर) येथील आठवडे बाजार परिसर चिखल व पाण्याने नागरिकांची चांगलीच दैना झाली. भाजीपाला, मिठाई तसेच इतर दुकानासमोर पाणी व चिखलाचे साम्राज्य पसरल्याने बाजाराची दैनीय अवस्था झाली. यामुळे व्यापार्‍यांसह ग्राहकांचे मोठे हाल झाले. वाळकीचा आठवडे बाजार सोमवारी भरतो. दिवसभर पावसाची रिपरिपचालू असल्यामुळे बाजारात चिखल व पाणी साचले. यामधून ग्राहकांना चालावे लागत होते. थोडासा पाऊस झाला, तरी चिखल होतो. आठवडे बाजारात माल विक्रीसाठी व्यापारी मोठ्या प्रमाणात येते आहेत. त्यात जागा अपुरी पडत असल्याने वाढलेले व्यापारी अन् अपुर्‍या जागे अभावी भाजी बाजार रस्त्यावर आला आहे.

याचा रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. त्यात व्यापारी व ग्राहकांची वाहने रस्त्याच्या कडेला लावली जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते. बाजार अन्य जागेवर हलवावा, अशी मागणी वाहन चालक करत आहेत. आठवडे बाजारामुळे परिसरातील वडगाव तांदळी, देऊळगाव सिध्दी, दहिगाव साकत, शिराढोण, राळेगण, गुंडेगाव, बाबुर्डी बेद, वाळुंज, पारगाव, बाबुर्डी घुमट, अरणगाव खडकी, खंडाळा आदी गावांतील ग्राहक व व्यापाररी येथे येतात. त्यामुळे आठवडे बाजारामध्ये मोठी गर्दी होते.

नगर-श्रीगोंदा मार्ग बाजारालगत जात असल्याने, या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते. या रस्त्यावरच व्यापारी व बाजारकरू वाहने उभी करतात. त्यातच रस्त्याच्या दुसर्‍या बाजुला टपरीधारकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या मार्गावर लहान मुलांची वर्दळ असते. यामुळे चालकांना वाहने चालविणे मोठे जिकरीचे बनले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याव बाजार

परिसरातील 10 ते 12 गावांतील लोकांसाठी वाळकीचा आठवडे बाजार खरेदी विक्रीच्या द़ृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळेच इथे येणार्‍या स्थानिक विक्रेत्यांबरोबर बाहेरील व्यापार्‍यांची संख्या मोठी आहे. शेतकर्‍यांना माल विक्रीसाठी जागा मिळत नसल्याने आरोग्य केंद्राकडे जाणार्‍या रस्त्यावर बसत आहेत. यामुळे रुग्णालयाकडे जाणारा मार्ग बंद होतो. त्यातच या ठिकाणी टपरीधारकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. अत्यावश्यक उपचारासाठी एखाद्या रुग्णास इतरत्र हलवायचे असल्यास, चारचाकी वाहनास व्यापारी रस्त्यावर बसल्याने अन् अतिक्रमणामूळे रस्ताच शिल्लक राहत नाही.

Back to top button