भोपाळ वायू दुर्घटना : पीडितांच्या भरपाईच्या मुद्यावर केंद्राने भूमिका स्पष्ट करावी : सर्वोच्च न्यायालय | पुढारी

भोपाळ वायू दुर्घटना : पीडितांच्या भरपाईच्या मुद्यावर केंद्राने भूमिका स्पष्ट करावी : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भोपाळ वायू दुर्घटना पीडितांना जास्त भरपाई देण्याच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. यासंदर्भातील पुढील सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी घेतली जाईल, असेही न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

भोपाळ वायू दुर्घटना प्रकरणातील पीडितांना जास्त भरपाई देण्याची मागणी काही काळापासून केली जात आहे. यासंदर्भात तत्कालीन संपुआ सरकारने २०१० साली क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. भोपाळ वायू दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या युनियन कार्बाईडची मालकी आता दावू केमिकल्सकडे आहे. पीडितांना ७ हजार ४०० कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याची मागणी आहे. यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत.

१९८४ साली भोपाळमध्ये वायू दुर्घटना होऊन असंख्य लोकांचा मृत्यू झाला होता. न्यायमूर्ती कौल यांच्याबरोबरच न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती ए. एस. ओक, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button